नूपुर शर्मांचे समर्थन करणाऱ्यावर हल्ला; १३ ते १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:39 AM2022-08-07T10:39:10+5:302022-08-07T10:39:24+5:30
अमित माने व सनी पवार हे गुरुवारी सायंकाळी राशीन येथे कार्यक्रमासाठी दुचाकीवरून चालले होते.
कर्जत (जि. अहमदनगर) : सोशल मीडियावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या तरुणास तेरा ते चौदाजणांनी जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.४) सायंकाळी कर्जत येथे घडली.
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रतीक ऊर्फ सनी राजेंद्र पवार असे असून त्याच्यावर अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अमित राजेंद्र माने (रा. कर्जत) यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी शाहरुख खान पठाण, सोहेल खान पठाण, निहाल खान पठाण, इलाईल शेख, टिपू पठाण, अब्रार ऊर्फ अरबाज कासम पठाण, अर्शद पठाण, अकीब सय्यद (सर्व रा. कर्जत) यांच्यासह तेरा ते चौदाजणांविराेधात जिवे मारण्याचा प्रयत्न, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोघांना कर्जत पोलिसांनी तत्काळ अटक केली.
अमित माने व सनी पवार हे गुरुवारी सायंकाळी राशीन येथे कार्यक्रमासाठी दुचाकीवरून चालले होते. आणखी मित्र येणार असल्याने ते कर्जतमधीलच राशीन रस्त्यावरील अक्काबाई चौकाजवळ उभे होते. त्यावेळी एक कार, तीन दुचाकीवरून तेरा ते चौदा युवक आले. त्यांनी जातिवाचक शिवीगाळ सुरू केली. त्यातील शाहरुख खान पठाण, सोहेल खान पठाण, निहाल खान पठाण, इलाईल शेख, टिपू पठाण, अब्रार ऊर्फ अरबाज कासम पठाण, अर्शद पठाण, अकीब सय्यद यांनी सनी पवार यास लाकडी दांडक्याने, कोयता, तलवार मोटारसायकलचा लोखंडी शॉकअब्झॉर्बर, हॉकी स्टीक, दगड आदींनी मारहाण केली. यामुळे सनी जखमी झाला.
‘तुझा उमेश कोल्हे करू’
फिर्यादी व सनी पवार यांनी हल्लेखोरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सर्वजण अंगावर धावून येत होते. ‘तू सोशल मीडियावर सारखे आय सपोर्ट नूपुर शर्मा, कन्हैयालाल यांचे स्टेटस व इन्स्टाग्रामवर माहिती टाकत असतोस. तुझे पाहून इतरही लोक सपोर्ट करू लागले आहेत. तुझा उमेश कोल्हे करू’, असे म्हणत शाहरूख खान पठाण याने सनी पवार याच्यावर तलवारीने वार केला. इतरांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करणारे निघून गेल्यानंतर मित्रांनी सनीला कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.