साईचरणी फुलण्याचा कमळाचा प्रयत्न?
By Admin | Published: September 14, 2014 11:08 PM2014-09-14T23:08:40+5:302024-03-26T14:37:23+5:30
प्रमोद आहेर, शिर्डी महाआघाडीतील जागावाटपाचा गुंता सोडवताना शिर्डीच्या जागेसाठी भाजपाने आग्रह धरल्याचे वृत्त आहे़
प्रमोद आहेर, शिर्डी
महाआघाडीतील जागावाटपाचा गुंता सोडवताना शिर्डीच्या जागेसाठी भाजपाने आग्रह धरल्याचे वृत्त आहे़ शिर्डीसह श्रीरामपूरची जागा घेऊन उत्तरेत शिर्डी-श्रीरामपूर-नेवासे असा भाजपाचा बेल्ट तयार करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे़
शिर्डी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थस्थळ असल्याने, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही साईभक्त असल्याने प्रतिष्ठेचा असणारा हा मतदारसंघ आपल्याकडे असावा, असा सेना-भाजपा दोन्हीचाही प्रयत्न आहे़ आजवर हा मतदार संघ शिवसेनेकडे होता़ मात्र यावेळी भाजपाला शिवसेनेकडून काही जागा अधिक मिळण्याचे संकेत असल्याने त्यात हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे़ त्यादृष्टीने येथील भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर व जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे हे राज्यस्तरीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे़ विशेष म्हणजे दोघेही संघाचे स्वयंसेवक आहेत़ गेल्या चार दिवसांपासून गोंदकर मुंबईत तळ ठोकून होते़ गेल्या महिन्यातच गोंदकर व कापसे यांनी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शिर्डी मतदारसंघाचे महत्व पटवून देत तो भाजपाकडे घेण्याचा आग्रह धरला होता़ शिवाय दोघांनीही उमेदवारीची तयारी दर्शवत फडणवीस यांना शिर्डीतून लढण्यासाठीही निमंत्रण दिले होते़
याशिवाय काँग्रेसला रामराम करण्याच्या मन:स्थितीत असलेले जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेही शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे़ शिर्डीची जागा किंवा साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद व श्रीरामपूरची जागा मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे़ या दोन्हीही जागा सेनेकडे असल्याने ससाणे सेनेच्या संपर्कात असले तरी त्यांची पहिली पसंती राष्ट्रीय राजकारणात प्रबळ असलेल्या भाजपाला आहे़
आता जागेच्या देव-घेवीत शिर्डी व श्रीरामपूर भाजपाकडे आले,तर ससाणे कैलास कोतेंसह भाजपाच्या गाडीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही़