आश्वीत सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 04:25 PM2018-08-12T16:25:06+5:302018-08-12T16:26:12+5:30
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील भरबाजारपेठेत असलेल्या सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील भरबाजारपेठेत असलेल्या सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी दीपक लाड (वय ३५, रा.वरंवडी, ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
सेंट्रल बँकेचे आश्वी शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुभांरे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आरोपी दीपक लाड याने आश्वी बाजारपेठेतील सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये प्रवेश करीत एटीएमचे सेंसर व एटीएम मशीनचे लॉक तोडले. त्यामुळे तेथे असलेले सायरन जोरात वाजण्यास सुरवात झाल्याने आरोपीने गडबडीत सायरनच्या वायरी तोडण्याचा प्रयत्न केला. सायरनच्या आवाज ऐकून पहाटे गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय उजे, चालक पी. एन. झोडगे व पोलीस नाईक पी.सी.खाडे यानी तेथे येऊन आरोपी दीपक लाड याला ताब्यात घेतले आहे.