अहमदनगरमध्ये मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न : बाबुर्डी बेंद येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 03:00 PM2019-04-23T15:00:29+5:302019-04-23T15:01:33+5:30
ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणा-या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगर: ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणा-या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक कर्मचा-यांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.
जालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. या ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तसेच भारतीय निवडणूक आयोगाला वारंवार लेखी स्वरूपात निवेदनही दिलेली आहेत. आज सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यांनी जाताना खिशात कुठलीतरी टणक लोखंडी वस्तू नेली होती. मतदान यंत्राजवळ मतदानासाठी आात गेल्यावर त्यांनी सदर वस्तू बाहेर काढली. ती जोरात मशीनवर मारली. एकदम आवाज येताच तेथे नियुक्तीस असलेल्या कर्मचा-यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चोभे यांना सरकारी वाहनात नेले. तेथून नगर तालुका पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोभे यांनी ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यासाठी मतदान मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.