"माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न"; शरद पवारांचं टीकास्त्र
By सुदाम देशमुख | Published: May 21, 2023 12:39 PM2023-05-21T12:39:08+5:302023-05-21T12:48:31+5:30
हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.
अहमदनगर; माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे कारस्थान काही लोकांकडून सुरू आहे. त्याविरुद्ध उभं राहणं आणि सर्वसामान्य, कष्टकरी, कामगारांना न्याय देण्याची भूमिका वठण्यासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केली.
हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर बाबा आढाव, पोपटराव पवार, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश प्रवक्ते ताराचंद मस्के आदी यावेळी उपस्थित होते.
माथाडी कामगार कायदा लागू करण्याच्या भूमिकेवर बाबा आढाव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शरद पवार पुढे म्हणाले, कर्नाटकमध्ये सत्ताधार्यांचे सरकार येईल असे सांगितले जात होते. परंतु सामान्य माणसांनी एकजूट दाखवली आणि कर्नाटकमध्ये तिथे सामान्य लोकांची आज सत्ता स्थापन झाली. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील तिथे मुख्यमंत्री झाला असून ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये अशाच प्रकारची एकजूट दाखवली तर परिवर्तन नक्की होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
जातीजातीमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये विद्वेष पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेही घडला. परंतु अशाविरुद्ध समाजाने आवाज उठवला पाहिजे. त्याविरुद्ध लढले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.