तहसीलदारांच्या पथकाला वाळू तस्करांचा डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 05:21 PM2019-11-27T17:21:47+5:302019-11-27T17:22:08+5:30
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल पथकावर वाळू तस्करांनी डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान ढवळपुरी शिवारात घडला. याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी स्वत: पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पारनेर : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल पथकावर वाळू तस्करांनी डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान ढवळपुरी शिवारात घडला. याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी स्वत: पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावेळी हे पथक वाळू तस्करी करणारा डंपरचा पाठलाग करीत होते.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या महसूल पथकासह मंगळवारी रात्री ढवळपुरी शिवारात वाळू चोरी विरोधी कारवाई करण्यासाठी जात असताना एक डंपर त्यांना दिसला. त्यांनी या डंपर चालकास वाहन थांबण्यास सांगितले. मात्र त्याने डंपरमधील वाळू रस्त्यावर ओतून दिली. त्यावेळी तहसीलदार देवरे व त्यांचे पथकाने पाठलाग करीत डंपर पकडला. यावेळी महसूल पथकास वाळू तस्करांनी धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी अक्षय पाडळे, आकाश रोहोकले, बापू सोनवणे या तिघांविरुध्द सरकारी कामात अडथळा व जिवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.