असरच्या आडून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न; नगरमध्ये लोकमत चर्चासत्रात शिक्षकांनी उपस्थित केले प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 08:21 PM2018-01-25T20:21:59+5:302018-01-25T20:42:05+5:30
शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे.
अहमदनगर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. असरच्या आडून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बदनाम करून खासगी करण्याचा डाव रचला जात असल्याचा सूर शिक्षकांनी आळवला.
अॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट-२०१७ (असर)चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालाबाबत ‘लोकमत’तर्फे गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी यावेळी असर अहवालाची पोलखोल करत हे सर्वेक्षण अशास्त्रीय पध्दतीने केल्याचा आक्षेप नोंदविला. मुख्याध्यापक लक्ष्मण टिमकर, भास्कर नरसाळे, शिक्षक नेते संजय कळमकर आणि शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी चर्चेत सहाभाग घेतला.
असर संस्थेतर्फे सन २००५ पासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यात येते़ सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर होतो. सरकारकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात, असे सांगितले जाते. मग गेल्या बारा वर्षांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा का झाली नाही, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला. याचाच अर्थ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सर्वेक्षण न करता केवळ दोष दाखवून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणे हा एकमेव उद्देश असल्याचे यावरून उघड होते. जर मुलांना लिहिता वाचता येत नाही, मग एसएससी बोर्डाचा निकाल ९९ टक्के कसा लागतो़ शिक्षण विभागाकडून १०० टक्के मुलांचे सर्वेक्षण केले जाते़ परंतु, असर कडून नमुन्यादाखल काही गावातील मुलांचे सर्वेक्षण होते़ त्यावरून सर्वच मुलांची गुणवत्ता ठरविली जाते़ ही पध्दतच मुळात चुकीची असेही शिक्षक म्हणाले़ विद्यार्थ्यांच्या ढासळत असलेल्या गुणवत्तेवर शिक्षकांनी प्रकाश टाकला. गुणवत्ता ढासळण्यास केवळ शिक्षकच जबाबदार आहे, असे चित्र रंगविले जात आहे. परंतु गुणवत्ता ढासळण्यास शिक्षकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जबाबदार आहेत. कारण शिक्षकांना मुलांना शिकविण्यासाठी वेळच मिळत नाही़ शिक्षकांचे शिकविण्याचे तास, इतर कामे, प्रशिक्षणे, यासारख्या कामांचे असरने सर्वेक्षण करावे. म्हणजे शिक्षकांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो, याचा सर्वांनाच अंदाज येईल, असा सल्ला शिक्षकांनी असर संस्थेला दिला आहे.