काही सदस्यांची सत्कारासाठी दोन्ही मांडवांत हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:45+5:302021-01-21T04:19:45+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. मात्र, आता भाजप व महाविकास आघाडीकडून दावे-प्रतिदाव्यांची लढाई ...
केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. मात्र, आता भाजप व महाविकास आघाडीकडून दावे-प्रतिदाव्यांची लढाई सुरू झाली आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ४७ तर महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी ३३ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवल्याचा दावा केला आहे. काही नव्याने निवडून आलेले सदस्य दोन्ही मांडवांतील सत्कारासाठी हजेरी लावत असल्याने नेतेही बुचकळ्यात पडले आहेत.
तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा ग्रामपंचायतीत राजकीय दावे-प्रतिदाव्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. बहुतेक गावांत भाजप आणि महाविकास आघाडीतच सामने झाले. निकाल जाहीर होताच कोणाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या, यावरून राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाली. महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी तालुक्यातील ५९ पैकी ३३ ग्रामपंचायतींंत महाविकास आघाडीची सत्ता आल्याचा दावा केला आहे. तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही त्यांच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्याचे आव्हान गाडे यांनी कर्डिले यांना दिले. कर्डिले यांनीही तालुक्यातील ५९ पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा केला. गावातील नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या निवासस्थानी सत्काराचे आयोजन केले. यावेळी कर्डिले यांनी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांसोबत फोटोसेशन केले. तसेच विरोधकांनीही त्यांच्या ताब्यातील ३३ गावांच्या सदस्यांना एकत्रित करावे व त्यांच्यासोबत फोटो काढून दाखवावा, असे आव्हानच त्यांनी दिले. यामुळे ग्रामपंचायतींंमधील सत्ता स्थापनेवरून भाजप-महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आला.
कर्डिले यांनी त्यांच्या ताब्यात आलेल्या ४७ गावांची यादीच जाहीर करून टाकली. नगर तालुक्यात नव्याने निवडून आलेले काही सदस्य भाजप व महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांच्या सत्काराला उपस्थित राहून नेत्यांचीही दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत अशा काठावरच्या सदस्यांची भूमिका काय असेल, याची चर्चा रंगू लागली आहे.
....
५९ पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. हे आम्ही बोलून नाही तर सर्वांना एकत्र आणून त्यांचा फोटो काढून जाहीर केले आहे. विरोधकांनीही त्यांच्या ताब्यात असणाऱ्या गावांतील सदस्यांना एकत्र करावे. सर्वांचा एकत्र फोटो काढावा, मगच आम्ही तुमचा दावा मान्य करू. विनाकारण तालुक्यातील जनतेची दिशाभूल करू नये. त्यांनी गावनिहाय सदस्यांची नावे जाहीर करावी.
- शिवाजी कर्डिले,
माजी आमदार, भाजप
-----
५९ पैकी ३३ ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. जेऊर गटात आम्ही मोठे यश मिळवले आहे. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या बहुतांश गावांत सेनेचा सरपंच होणार आहे. भाजप नेते चुकीच्या याद्या सांगून जनतेला फसवत आहेत.
- प्रा. शशिकांत गाडे,
दक्षिण जिल्हाप्रमुख, शिवसेना
फोटो : २० नगर सत्कार
नगर तालुक्यातील नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर येथे सत्कार केला.