मनसेच्या भूमिकेमुळे पवारांच्या दौऱ्याकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:51+5:302021-01-23T04:20:51+5:30
अहमदनगर : कोरोना रुग्णांची जास्तीची बिले परत करण्याच्या मागणीचे फलक दाखविण्याची भूमिका मनसेने घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ...
अहमदनगर : कोरोना रुग्णांची जास्तीची बिले परत करण्याच्या मागणीचे फलक दाखविण्याची भूमिका मनसेने घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नगर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुग्णांना पैसे परत करण्याच्या भूमिकेवर मनसे ठाम असल्याने पवार यांचा दौरा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. नगर- औरंगाबाद महामार्गावरील सुरभी हॉस्पिटल प्रायव्हेट लि.चे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पवार ज्या रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी येत आहेत, त्या रुग्णालयावरही कोरोना रुग्णांचे पैसे परत न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शहरातील रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून आकारलेली जास्तीची बिले परत करावीत, अशी मनसेची मागणी आहे. या मागणीसाठी मनसेकडून पवार यांनाच फलक दाखविण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पवार यांच्या दौऱ्याबाबत शहरात चर्चा आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली गेली नाही, तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत आहे. आमदार जगताप यांनीही याविषयी बोलणे टाळले आहे. रुग्णालयानेही रुग्णांचे पैसे परत करण्याबाबत पावले उचलली नाहीत. महापालिकेचेे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता पैसे परत केल्याची माहिती महापालिकेला प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. कोरेाना काळात शरद पवार यांच्याकडून नगर शहरासाठी मोठी मदत केली गेली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध झाली; पण रुग्णालयांनी मात्र गोरगरीब रुग्णांकडून जास्तीची बिले वसूल केली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या चौकशीतून ही बाब समोर आली. शहरातील रुग्णालयांना पैसे परत करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या; परंतु रुग्णालयांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे महापालिकेने परवाने रद्द करण्याबाबत रुग्णालयांना कळविले आहे.
....