बालचित्रपट महोत्सवात ‘पप्पू की पगदंडी’ चिमुकल्यांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:17 PM2019-11-15T14:17:01+5:302019-11-15T14:18:39+5:30
लहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या ‘पप्पू की पगदंडी’ या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली.
अहमदनगर : लहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या ‘पप्पू की पगदंडी’ या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली. कोणतेही काम लहान मोठे नसते. प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत त्याला पुढे आणले पाहिजे तसेच त्यातून चांगली निर्मिती झाली पाहिजे, असा संदेश देणा-या या चित्रपटाने या मुलांच्या मनाचा ठाव घेतला.
बालदिनानिमित्त केंद्र सरकारची बालचित्र समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित बालचित्रपट महोत्सवास कार्निवल माय सिनेमा येथे गुरूवारी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, बालचित्र समितीचे प्रशासनिक अधिकारी राजेश गोहिल, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, अभिनेते मोहनीराज गटणे, अभिनेते प्रकाश धोत्रे आदींच्या उपस्थितीत या बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.
महानगरपालिकेच्या विविध शाळांतील मुलामुलींची चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणि चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर चेह-यावर फुललेला आनंद बच्चेकंपनीच्या चेह-यावर दिसत होता.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बालदिनाच्या सगळ्या बच्चे कंपनीला शुभेच्छा देत जे जे आवडतं, ते मनापासून करण्याचा मोलाचा सल्ला दिला. बालचित्र समितीचे गोहिल यांनी मुलांच्या भावविश्वाला चांगले वळण देणारे आणि शिकवण देणारे चित्रपट बालचित्र समिती तयार करत असते. हे चित्रपट मुलांना नक्कीच आवडतील, असे सांगितले. अभिनेते गटणे यांनी मुलांनी त्यांच्या कलागुणांचा विकास करावा. अभ्यासासोबतच एका आवडीच्या कलाक्षेत्रात पारंगत व्हावे, असे सांगितले. अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी आभार मानले.
१९ नोव्हेंबरपर्यंत माय सिनेमा चित्रपटगृहात ‘पप्पू की पगदंडी’, आशा स्क्वेअर येथे ‘पिंटी का साबुण’ आणि ‘भागो भूत’, तर नाथगंगा (लोणी) येथे ‘बंडू बॉक्सर’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे चित्रपट सकाळी ८ ते साडेदहा या वेळेत पाहता येणार आहेत.
लहान मुलांसाठी प्रबोधन, प्रोत्साहन आणि जिज्ञासा जागृत करणारे आणि मनोरंजन करणारे चित्रपट मुलांना विनामूल्य पाहता येणार आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, दिलीप थोरे आदी उपस्थित होते.