औरंगाबाद पोलिसांची नगरच्या वाळू तस्करांवर कारवाई; श्रीरापुरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:22 PM2018-06-01T13:22:53+5:302018-06-01T13:23:25+5:30
श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.
अहमदनगर : श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. त्यामुळे श्रीरामपुरात आज सगळा उपसा बंद झाला आहे. या कारवाईमुळे नगरचे पोलीस व महसूल यंत्रणाही उघडी पडली आहे.
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, संगमनेर, पारनेर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु असताना येथील महसूल व पोलीस प्रशासन काहीही कारवाई करताना दिसत नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे महसूल विभागाचे मूळ काम दुर्लक्षित करुन महापालिकेत कर्मचाºयांची झाडाझडती घेत आहेत. जेथे वाळूचे अधिकृत ठेके दिले गेले तेथे जेसीबी, पोकलन मशीन लावून अमाप वाळू उपसली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी द्विवेदी यांना नागरिकांनी पुरावे पाठवूनही ते काहीच कारवाई करायला तयार नाहीत.
श्रीरामपूर तालुक्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवरही अमाप उपसा सुरु आहे. ही वाळू औरंगाबादमध्ये जाते. रात्री वाळू उपसा करणारे जेसीबी, पोकलेन व वीस वाहने औरंगाबाद जिल्ह्यातील सहायक पोलीस अधीक्षक मुंडे यांनी पकडली आहेत. या कारवाईचा धसका घेऊन श्रीरामपुरातील वाळू उपसा शुक्रवारी सकाळपासून बंद आहे. जे काम औरंगाबाद पोलीस करु शकतात ते काम नगर पोलिसांना व येथील महसूल यंत्रणेला का जमत नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गुरुवारी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतरही राहुरी, संगमनेर तालुक्यातील वाळू उपसा थांबलेला नाही.