ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवले संगमनेरचे मैदान रंगला ऐतिहासिक सामना: ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघ चार धावांनी विजयी
By शेखर पानसरे | Updated: March 23, 2025 21:35 IST2025-03-23T21:21:37+5:302025-03-23T21:35:06+5:30
संगमनेर नगर परिषदेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील मैदानावर ऑस्ट्रेलिया येथील कॅनबेराच्या महिला क्रिकेटपटू आणि स्थानिक महिला क्रिकेटपटूंनी एकत्र सराव केला.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवले संगमनेरचे मैदान रंगला ऐतिहासिक सामना: ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघ चार धावांनी विजयी
शेखर पानसरे
संगमनेर (जि. अहिल्यानगर) : संगमनेर नगर परिषदेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील मैदानावर ऑस्ट्रेलिया येथील कॅनबेराच्या महिला क्रिकेटपटू आणि स्थानिक महिला क्रिकेटपटूंनी एकत्र सराव केला. त्यानंतर याच मैदानावर रविवारी (दि. २३) महिलांचा ऐतिहासिक असा क्रिकेट सामना रंगलेला पहायला मिळाला. ‘ऑस्ट्रेलिया ११’ आणि ‘संगमनेर ११’ या दोन्ही संघांत ऑस्ट्रेलिया आणि स्थानिक महिला खेळाडूंचा समावेश होता. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत असताना सुपर ओव्हर खेळविण्यात आली, यात ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघाने चार धावांनी विजय मिळविला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने संगमनेरसारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव देण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरच्या वतीने या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक संघात ऑस्ट्रेलियाचे पाच आणि स्थानिक सहा अशा एकूण ११ खेळाडूंचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचे टीम मॅनेजर, प्रशिक्षण, फिजिओथेरपिस्ट आणि खेळाडू असे एकूण १४ जण संगमनेरात आले होते. संगमनेरातील रहिवासी असलेली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळविलेली आल-राउंडर क्रिकेटपटू पूनम खेमनर हिच्यासह संगमनेरातील स्थानिक मुलींनीदेखील सहभाग नोंदवल्याने हा सामना ऐतिहासिक ठरला.
महिला क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल
क्रिकेटपटू अंजली माघाडे आणि गायत्री माघाडे या दोघी बहिणींच्या घरी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंनी भेट देत त्या दोघी बहिणींना सुखद धक्का दिला. माघाडे भगिनींनी क्रिकेटमध्ये देदीप्यमान कामगिरी केली आहे. आगामी काळात महिला क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल आहे, यावर चर्चा झाली.
सुपर ओव्हर खेळविण्यात आला
‘संगमनेर ११’ संघाने प्रथम टॉस जिंकल्यानंतर फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाने ८ षटकांच्या सामन्यात ७३ धावा केल्या. त्यानंतर फलदांजी करण्यास आलेल्या ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघानेदेखील ७३ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हर खेळविण्यात आली. त्यात ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघाने ११ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये फलदांजी करताना ‘संगमनेर ११’संघाला ७ धावा करता आल्या, त्यात ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघाचा चार धावांनी विजय झाला. हा सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. मैथिली तांबे आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला गौरविण्यात आले.