मुख्याधिका-यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:12 PM2018-10-02T17:12:02+5:302018-10-02T17:12:41+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे वेळेचे बंधन न पाळणा-या कर्मचा-यांना झटका दाखविण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांनी सोमवारी चक्क पालिकेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले.
त्यामुळे लेटलतिफ कर्मचा-यांची एकच धांदल उडाली. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणुक जवळ येत असल्याने कोणी पदाधिकारी बोलत नाही. मुख्याधिकारी दातीर हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे कर्मचा-यांना रान मोकळे झाल्याने आपल्या मर्जीनुसार काम सुरू होते. गेल्या दोन महिन्यांपासून नगरपालिकेत कर्मचा-यांची मनमानी सुरू आहे. मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना अनेकदा कामावर वेळेत येण्याबाबत समज दिली. पण कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी आठवडे बाजारचा दिवस असल्याने अनेक नागरिक पालिकेत थांबले होते. दुपारचे सव्वा तीन वाजले तरी एकही कर्मचार हजर नसल्याचे पाहून मुख्याधिकारी दातीर यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचा आदेश कर्मचा-यांना दिला. त्यामुळे नंतर आलेल्या सर्व कर्मचा-यांना बाहेर उभे रहावे लागले. प्रवेशद्वार उघडल्यानंतर मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना पालिका तुमची घरची संस्था आहे का?, तुम्ही वेळेवर का येत नाही?, अशी विचारणा करीत चांगलेच झापले. कर्मचा-यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पालिकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.