निराधारांना आधार देण्यासाठी धडपडणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:45 PM2019-08-04T13:45:59+5:302019-08-04T13:46:29+5:30
अपंग अहोरात्र तीन दिवस पायी पायी गल्ली न गल्ली फिरून घोटी गाव पिंजून काढले़ त्यातून भरगच्च पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला.
भाऊसाहेब येवले
राहुरी : अपंग अहोरात्र तीन दिवस पायी पायी गल्ली न गल्ली फिरून घोटी गाव पिंजून काढले़ त्यातून भरगच्च पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला. या अपंगाचे नाव होते गोपाल शिंदे़ गोपालपासून पे्ररणा घेत राहुरी येथील शिवशाहीर डॉ़विजय तनपुरे यांना अनाथ, दिव्यांग, वृध्द कलावंत, अनाथ, दुर्लक्षीत वृध्द व स्पर्धा परीक्षाचे केंद्र काढण्याची पे्रेरणा मिळाली़ त्यातून शिवाश्रम मेंढी (ता़सिन्नर) येथे लवकरच साकार होत आहे़
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हे शाहीर तनपुरे यांचे गुरू़ त्यांनी आयुष्यभर शाहिरीतून २२०० अनाथ मुले पदवीधर केले होते़ शिवाश्रम पंढरपूर येथे सुरू केले होते़ परंतु देशमुख यांचे निधन झाल्याने प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही़ गुरूचे अपूर्ण राहिलेले स्वप्न राहुरीचे शिवशाहीर तनपुरे हे पूर्ण करीत आहेत़ शिवाश्रामासाठी ५० गुंठे जागा दानशुर मधुकर गीते यांनी दान म्हणून दिली आहे़ या जागेवर शिवाश्रम प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे़ शिवाश्रमामध्ये अपंगाना रोजगार व निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़अनाथ मुले आर्थिक अडचणीमळे प्रशासनापासून दूर आहेत़ त्यांना स्पर्धा परीक्षेचे व्दार खुले करून देण्यात येणार आहे़ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विना मोबदला १६ शिक्षकांनी तयारी दर्शविली आहे़ विद्यार्थ्यांना ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ आॅनलाईन मार्गदर्शन मुंबई येथील संस्था करणार आहे़
वृध्दांसाठी शेवटचे दिवस आनंदात जावे म्हणून आधार देण्यात येणार आहे़ त्यांच्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ अंधांसाठी बे्रल लिपीचे शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ स्किल इंडिया अंतर्गत ६० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिवाश्रमात आॅनलाईनचे डाटा वर्कींग काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे़
शाहीर विजय तनपुरे यांनी पोवाडे व कीर्तनाच्या माध्यमातून आलेल्या रकमेचा २५ टक्के भाग बाजूला काढला होता़ त्यातून शिवाश्रम साकार होत आहे़ याशिवाय दानशूर व्यक्तींना बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले आहे़ वयाच्या दुसऱ्यावर्षी अपंगत्व आलेल्या शिवशाहीर तनपुरे यांनी सात समुद्रापलिकडे जाऊन शिवाजी महाराजाचे विचार पोवड्याच्या माध्यमातून पोहोचविले़ शिवाश्रमाच्या माध्यमातून चाललेली धडपड धडधाकट माणसाला दीपस्तंभ ठरावी अशी आहे़
शिवाश्रम परिसरात गावरान गायींचा मुक्त गोठा तयार करण्यात येणार आहे़ अपंगाच्या स्किलनुसार या प्रकल्पातून बाय प्रॉडक्टचे काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ प्रकल्पासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहे़