नोकरी सोडून गोमाता सांभाळणारा अवलिया; आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ हातगावात सुरू केली गोशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:59 PM2020-01-05T14:59:40+5:302020-01-05T15:00:37+5:30
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील एका युवकाने महाराष्ट्र सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक ही शासकीय नोकरी सोडून आईच्या स्मरणार्थ गावातच गोशाळा सुरू केली.
संजय सुपेकर ।
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील एका युवकाने महाराष्ट्र सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक ही शासकीय नोकरी सोडून आईच्या स्मरणार्थ गावातच गोशाळा सुरू केली. या गोपालक अवलियासह संपूर्ण कुटुंबालाच गायींचा लळा लागला आहे.
हातगाव येथे गोपालक निलेश बाबासाहेब ढाकणे या युवकाने ‘वात्सल्य’ नावाने मे २०१९ मध्ये गोशाळा सुरू केली आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या निलेशने आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ गायींची सेवा करण्याचा विडा उचलला. या गोशाळेतील गायींना चारा टाकणे, सोडबांध करणे, पाणी पाजणे, शेण उचलणे, निगा राखणे, खाद्य तयार करून खाऊ घालणे आदी कामे कुटुंबातील सर्वजण आवडीने करतात. निलेशसह त्यांची पत्नी चंदा, वडील बाबासाहेब व वर्ग तिसरीतील चिरंजीव आदित्य आदींनी गोसेवेस वाहून घेतले आहे. गायींसाठी पत्राशेड उभारले. चारा टाकण्यासाठी लोखंडी चारा दावण तयार केली. परिसरातील अनेकजण भाकड, बेवारस, वृद्ध गायी त्यांच्याकडे आणून सोडत आहेत. मागील दुष्काळी परिस्थितीत तर संपूर्ण तालुका चारा टंचाईने होरपळत असताना निलेशने कुठल्याही शासकीय मदतीविना पदरमोड करून गायींसाठी चारा व पाणी उपलब्ध केले. काही शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी झाल्यावर काही गायी परत नेल्याही आज या गोशाळेत दहा ते बारा गायी आहेत. त्यांचे संगोपन करताना कधी कुटुंबांची जबाबदारी तर अनेकदा शेतीकामे अर्ध्यावर सोडून हा अवलिया गोपालक गायींना चारा मिळावा, यासाठी मदतीची हाक देत वणवण फिरत आहे.
लोकसहभागाने दिला आधार..
ढाकणे कुटुंबाची धडपड पाहून अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला. भगवान बाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष मयुर वैद्य यांनी तीन हजार रूपये, बोधेगावचे अर्जुन अंदुरे यांनी गायींना बांधण्यासाठी दोरखंड, सोनई येथील राहुल आंधळे यांनी तीन हजार रूपये, बालमटाकळीचे उपसरपंच तुषार वैद्य यांनी चार पोते पेंड, इतर अनेकांनी आर्थिक व साहित्य स्वरूपात मदतीचा आधार दिला.