कोरोनाबाधितांना जीवदान देणारा श्रीगोंद्याचा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:18+5:302021-01-01T04:15:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : कोणताही गवगवा न करता जिल्ह्यातील २४३ कोरोनाबाधित रुग्णांना पुणे येथील एका रुग्णालयात दाखल करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : कोणताही गवगवा न करता जिल्ह्यातील २४३ कोरोनाबाधित रुग्णांना पुणे येथील एका रुग्णालयात दाखल करून त्यांना जीवदान देण्याचे काम श्रीगोंदा येथील सतीश बोरा या अवलियाने केले आहे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावले.
श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा हे विविध सामाजिक संस्था व अनेक रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे असतात. पुणे येथील इनलॅक्स बुधराणी रुग्णालयाच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्णांना नेत्रसेवा देण्यासाठी अभियान राबवत आहे. त्यांना बोरा यांनी स्वत:चे मंगल कार्यालय नेत्रतपासणी शिबिरासाठी मोफत उपलब्ध करून दिले. या शिबिराच्या माध्यमातून श्रीगोंदा, कर्जत, दौंड तालुक्यांतील पाच हजार नेत्ररुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.
त्यामुळे बोरा यांचा बुधराणी रुग्णालयाशी घनिष्ठ संबंध आला. त्यांनी या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा मिळवून दिला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळत नव्हते त्यावेळी डॉ. विलास गुंदेचा, डॉ. नीलेश कोद्रे यांच्या मदतीने बोरा यांनी पुण्यातील रुग्णालयात २४३ रुग्णांना दाखल केले. त्यांची नियमित विचारपूस करीत त्यांना आधार देण्याचे काम केले.
काही रुग्णांना या वैद्यकीय सेवेसाठी आर्थिक मदत केली. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील ५०० कुटुंबांना किराणा माल, धान्य वाटप करून भूक भागविण्याचे काम केले. मात्र, कसलाच गवगवा या अवलियाने केला नाही.
---
तीन मित्र गेल्याचे शल्य..
डॉ. विलास गुंदेचा, डॉ. नीलेश कोद्रे हे खरे कोरोना योद्धे आहेत. मी कोरोनाबाधित रुग्णांना त्या दोघांपर्यंत पोहोच करण्याचे काम केले. २४३ पैकी २३४ रुग्णांचे प्राण वाचले. मात्र, सतीश पोखर्णा, बाबासाहेब ढवळे, अनिल गुगळे यांचा जीव वाचविण्यात आम्ही कमी पडलो. हे शल्य आयुष्यभर मनात घर करून राहील.
- सतीश बोरा,
व्यापारी, श्रीगोंदा
फोटो ३१ सतीश बोरा