अविनाश आदिकांचा आघाडी धर्माचा नारा; लहू कानडेंसाठी प्रचारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:07 PM2019-10-18T18:07:27+5:302019-10-18T18:08:18+5:30
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे पालन करत असून काँग्रेस उमेदवार लहू कानडे हे विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची साथ घेण्यास विरोध नाही, असेही आदिक यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे पालन करत असून काँग्रेस उमेदवार लहू कानडे हे विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची साथ घेण्यास विरोध नाही, असेही आदिक यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस उमेदवार कानडे यांच्या प्रचारार्थ स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित सभेत आदिक बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, उमेदवार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, ज्ञानदेव वाफारे, अजित कदम, सुरेश निमसे, सबाजी गायकवाड, कैलास बोर्डे, लकी सेठी, अर्चना पानसरे, सुभाष राजुळे, भाऊ डाकले, मल्लू शिंदे, अॅड.समीन बागवान, कॉ.श्रीधर आदिक यावेळी उपस्थित होते.
आदिक म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझ्यावर प्रचार समन्वयकाची जबाबदारी दिली. त्यामुळे मतदारसंघात येऊ शकलो नाही. मात्र तरीही उमेदवार कानडे व आमदार डॉ. तांबे यांच्या संपर्कात होतो. श्रीरामपूरला गोविंदराव आदिक, बॅरिस्टर रामराव आदिक यांसारख्या नेत्यांची परंपरा लाभली आहे. येथील जनता हुशार आहे. ते सलग तीन वेळा कुठल्याही लोकप्रतिनिधीला संधी देत नाहीत. काँग्रेसला कानडे यांच्या रुपाने उच्चशिक्षित व प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेला उमेदवार मिळाला आहे. ते निश्चितच मतदारसंघाचे विकासाचे प्रश्न सोडवतील. मी त्यांच्या सोबत आहे. विरोधी उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव निश्चित आहे. त्यानंतर कांबळे हे शिवसेना व भाजप संघटनेतही दिसणार नाहीत.
आमदार तांबे म्हणाले, कांबळे यांच्याकरीता लोकसभेला कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. मात्र त्यांनी संधी देऊनही विश्वासघात करत पक्ष बदलला. मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावांमध्ये विकासाचे प्रश्न रखडले आहेत. रस्त्यांचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. कांबळे यांनी अनेक गावांमध्ये एक रुपयाही निधी दिलेला नाही. प्रचारादरम्यान अनेक गावांमध्ये लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.
लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर तालुका दुष्काळी यादी व पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्यास आमदार भाऊसाहेब कांबळे हेच जबाबदार आहेत.
कांबळे यांनी विधानसभेत शब्दही काढला नाही. त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्नावर सभागृह डोक्यावर घ्यायला हवे होते. ज्ञानदेव वाफारे यांनी लहू कानडे हे दिवंगत गोविंदराव आदिक यांचेच शिष्य असून त्यांच्या विचारांचा वारसा ते पुढे नेत असल्याचे सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा आदिक, सबाजी गायकवाड, कैलास, बोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.