उघड्यावरचे पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:34+5:302021-07-17T04:17:34+5:30

पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप, जुलाब, गॅस्ट्रो, टायफाॅईड, कावीळ, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचेचे विकार आदी आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे ओपीडीत तपासणीसाठी, रुग्णालयात ...

Avoid eating outdoors and drinking contaminated water | उघड्यावरचे पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे टाळावे

उघड्यावरचे पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे टाळावे

पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप, जुलाब, गॅस्ट्रो, टायफाॅईड, कावीळ, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचेचे विकार आदी आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे ओपीडीत तपासणीसाठी, रुग्णालयात उपचारांसाठी आलेले पाहायला मिळतात. पावसाळ्यात उघड्यावरचे, तेलकट-तुपकट पदार्थ, शिळे अन्न, अती तिखट खाणे पूर्णपणे टाळावे. आहारात ताजे अन्न असावे. पाऊस पडल्यानंतर चमचमीत खाण्याचा मोह होतो. मात्र, बाहेरचे पदार्थ खात असल्यास ते टाळायला हवे. बाहेर खाल्ल्यानंतर आपण तेथेच पाणी पितो. हे पाणी अशुद्ध असल्यास पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन इतरही आजार असलेल्यांसाठी हे धोकादायक ठरू शकते.

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी पालेभाज्या, फळे खाणे चांगले आहे. मात्र, फळे, भाज्या चांगल्या स्वच्छ कराव्यात. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. हळद, आले, लसूण, सुंठ या पदार्थांचे सेवन करणे लाभदायी मानले जाते. सर्दी, खोकला वाटल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. शक्यतो पदार्थ गरम असतानाच ते खावेत. पचनाला जड असणारे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे. काही त्रास जाणवल्यास मनानेच कुठलीही औषधी, गोळ्या न घेता तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.

---------------

काळजी घेणे गरजेचे

साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होते. पावसाळ्यात डब्यात, गच्चीवर, गॅलरीमध्ये ठेवलेल्या वस्तू, अडगळीत ठेवलेले टायर यात पाणी साचून डासांची अधिक उत्पत्ती होते. डास चावल्यास डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. खिडक्यांना जाळ्या बसवणे गरजेचे असून लहान मुलांना मच्छरदानीमध्ये झोपवावे.

------------------

होऊ शकतो सर्दी, खोकला

लहान मुलांना आईस्क्रिम, कोल्ड्रिंक असे थंड पदार्थ देणे टाळावे. अनेकांना वर्षभर फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. हीच सवय घरातील लहान मुलांनाही लागते. पावसाळ्यात थंड पाणी पिल्याने त्याचा घशाला त्रास होऊन सर्दी, खोकला होऊ शकतो.

-----------------

आल्याचा चहा घ्यावा

पावसाळ्यात कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात पचनक्रिया नाजूक होते. त्यामुळे घरगुती जेवणच चांगले. मांसाहार शक्यतो टाळावा. पावसाळ्यात आल्याचा चहा घ्यावा. लहान मुलांना पाणी उकळून ते थंड करून गाळून द्यावे. मोठ्यांनी हे करावे.

------------------

पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. अन्नपदार्थांवर घोंगावणाऱ्या माशांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे बॅक्टेरिया पसरून पोटाचे आजार होऊ शकतात. उलट्या, जुलाब, ताप येणे ही पावसाळ्यातील आजारांची लक्षणे आहेत. कॉलरा, गॅस्ट्रो, टायफाॅईड यासारख्या आजारांची सा‌थ पावसाळ्यात दिसून येते.

-

- डॉ. सुशांत गीते, फिजिशयन, संगमनेर

Web Title: Avoid eating outdoors and drinking contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.