कार्यक्रम, लग्न समारंभ शक्यतो टाळाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:11+5:302021-06-16T04:28:11+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. तालुकास्तरीय ...

Avoid events, wedding ceremonies if possible | कार्यक्रम, लग्न समारंभ शक्यतो टाळाच

कार्यक्रम, लग्न समारंभ शक्यतो टाळाच

अहमदनगर : जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करावी. लग्न समारंभ, कार्यक्रम, सभा आदी सार्वजनिक कार्यक्रम शक्यतो टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सोमवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सध्या रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे शक्यतो टाळावेत अथवा कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करूनच करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अनेक गावे, नगर पंचायत आणि नगर परिषद क्षेत्रात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच त्या-त्या भागातील व्यापारी, उद्योजक, आस्थापना यांचे प्रमुख यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी या आस्थापना स्वत:हून लवकर बंद केल्या जात आहेत. आठवड्याच्या शेवटी शनिवारी अथवा रविवारी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे निश्चित कौतुक आहे.

Web Title: Avoid events, wedding ceremonies if possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.