मोबाईल गेममुळे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:50 PM2018-12-04T12:50:08+5:302018-12-04T12:50:13+5:30
इंटरनेटच्या अतिवापरामुळे बालगोपाळांसह तरूणांचे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
इसाक शेख
बालमटाकळी : इंटरनेटच्या अतिवापरामुळे बालगोपाळांसह तरूणांचे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
पूर्वी शाळेतील सुट्टी, उन्हाळ्याच्या सुट्या किंवा इतर रिकाम्यावेळी बालगोपाळ, तरूण पारंपरिक खेळ खेळताना दिसत होते. मात्र सध्या स्मार्टफोन व सोशल मीडियामुळे लपंडाव, क्रिकेट, सागरगोटे,भोवरा,सुरपारंब्या, गोट्या, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू,संगीतखुर्ची, साप शिडी, आठचल्लस, चंफूल, लगोरी,घोडी, शिवना पाणी, आंधळी कोशिंबीर अशा पारंपरिक खेळांची जागा स्मार्ट फोन व इंटरनेटने घेतली आहे. जुन्या खेळांमधून संघभावना, स्नेहभावना, एकमेकांना मदत करणे, जबाबदारीचे महत्त्व यासह नेतृत्वगुण सहजतेने विकसित होणे असे गुण वाढीस लागत होते. मामाच्या गावी हा खेळ खेळण्याची मजा काही वेगळीच होती.
मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन आरोग्य धोक्यात आले आहे. मुले व पालकांमध्ये संभाषण कमी होऊन सोशल मीडियावर मुलांचा जीव गुंतला आहे. काही मुले तर मोबाईलच्या अतिवापरामुळे वेगळ्या मार्गाने वाहत जाताना दिसत आहे. मोबाईलमुळे मुले व्यसनात गुरफटत चालली आहेत. अगदी पाच ते सहा वर्षांची लहान मुलेही स्मार्टफोनचा आग्रह धरू लागली आहेत. तरूणाई तर तासन्तास फेसबुक व व्हॉट्सअॅपवर व्यस्त असतात. एकत्र राहूनही प्रत्यक्ष आपापसात बोलण्याऐवजी मुले तासन् तास सोशल मीडियास प्राधान्य देत आहेत. या आभासी जगात लहान थोरांसह तरूण मुले पूर्णत: गुंतून गेलेली आहेत. या बाबींचा अतिरेक झाल्यामुळे मुलांमध्ये लहान व तरूण वयातच डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, एकाग्रता नसणे, वाचनाकडे दुर्लक्ष, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा यासारख्या आदी समस्या मुलांमध्ये वाढत आहेत. त्यामुळे तरुणांच्या व लहान मुलांच्या व्यक्तिमत्वावर व कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
मोबाईल व स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांसह तरूणांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे लहान मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास खुंटत चालला आहे. मोबाईलमुळे मुले हट्टी, एकलकोंडी होतात. मोबाईल घेऊन तासन्तास एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक व मानसिक वाईट परिणाम झालेले दिसतात. सतत मोबाईलकडे पाहण्यामुळे डोळ्यांचा त्रास होतो. मुले बाहेर खेळायला न गेल्यामुळे शारीरिक वाढ खुंटते. प्रत्येक मोबाईलमध्ये इंटरनेट असल्यामुळे कोणतीही माहिती, व्हिडीओ पहायला मिळत असल्याने मुले आहारी जात आहेत. -डॉ. विठ्ठल बुधवंत, बालमटाकळी.