बर्ड फ्लूचा २३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:32+5:302021-01-18T04:19:32+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात २६० पक्षी मृत झाले. त्यातील प्रत्येक गावातील मिळून एकूण २३ पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात ...
अहमदनगर : जिल्ह्यात २६० पक्षी मृत झाले. त्यातील प्रत्येक गावातील मिळून एकूण २३ पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पोल्ट्री व्यावसायिकांना त्यांचे शेडी स्वच्छता करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन करताना डॉ. भोसले म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावातील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आला आहे. ज्या भागात पक्षी मृत झाले, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र व अलर्ट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यामध्ये नगर, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी अशा चार तालुक्यांत पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. २३ पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. दरम्यानच्या काळात पोल्ट्रीचालकांनी त्यांच्या शेडची स्वच्छता करावी. तसेच शेड सॅनिटाइझ करून घ्यावे. जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ गंभीर स्वरूपात नाही. त्यामुळे बर्ड फ्लूबाबत नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.