लिंपणगावमध्ये देवदूतांचा रुग्णसेवेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:28+5:302021-05-17T04:18:28+5:30
श्रीगोंदा : लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील सिद्धेश्वर कोविड सेंटरमध्ये डॉ. प्रवीण जंगले, डॉ. हेमंत त्रिंबके, डॉ. जयेश कदम, ...
श्रीगोंदा : लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील सिद्धेश्वर कोविड सेंटरमध्ये डॉ. प्रवीण जंगले, डॉ. हेमंत त्रिंबके, डॉ. जयेश कदम, डॉ. राधाकृष्ण वागस्कर, मिथुन वायकर या देवदूतांनी रुग्णांची मोफत सेवा केली. त्यामुळे ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील देवदूतांच्या नि:स्वार्थ रुग्णसेवेमुळे गोरगरीब रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
लिंपणगाव हे २० हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. या गावात विविध व्यवसाय व शेतीतील मजुरी निमित्ताने स्थायिक झालेल्या गोरगरीब नागरिकांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या महामारीत लिंपणगाव, श्रीगोंदा फॅक्टरी हे केंद्रबिंद ठरले. तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण श्रीगोंदा फॅक्टरीवर आढळून आला होता.
कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी सरपंच शुभांगी जंगले, उपसरपंच अरविंद कुरुमकर व सुदाम पवार अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत लिंपणगाव येथे सिद्धेश्वर कोविड सेंटर सुरू केले.
या कोविड सेंटरमध्ये कोणतेही मानधन न घेता डॉ. प्रवीण जंगले, डॉ. हेमंत त्रिंबके, डॉ. जयेश कदम, डॉ. राधाकृष्ण वागस्कर यांनी रुग्णसेवेची धुरा खांद्यावर घेतली आहे. मिथुन वायकर यांनी स्वच्छता व सफाईचे काम स्वीकारले. त्यामुळे या आरोग्य मंदिरात दाखल झालेल्या रुग्णांना आधार आणि सेवा मिळाली. त्यामुळे रुग्णांचे मनोबल वाढले.
--
शंभर कोरोनाबाधितांवर मोफत उपचार
जंगलेवाडी येथील डॉ. प्रवीण जंगले हे गेल्यावर्षीपासून जंगलेवाडी, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मोफत उपचार करीत आहेत. डॉ. जंगले यांनी आतापर्यंत १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात अशी रुग्णसेवा केली.
---
रुग्णसेवेतून आत्मिक समाधान..
आमच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यांची वैद्यकीय सेवा करताना इतर कोरोनाबाधित रुग्णांची मोफत सेवा करणे गरजेचे वाटले. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून एक रुपयाही न घेता उपचार केले. याचे मोठे आत्मिक समाधान मिळाले आहे, असे डॉ. प्रवीण जंगले यांनी सांगितले.
--
फाेटो पासपोर्ट
१६ प्रवीण जंगले, हेमंत त्रिंबके, जयेश कदम, राधाकृष्ण वागस्कर, मिथुन वायकर