सरपंच पद घरात अन् घराणेशाहीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:16+5:302021-02-12T04:19:16+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी पार पडल्या. यामध्ये बहुतेक गावात दिग्गज नेत्यांनी सरपंचपदाची सूत्रे कुटुंबात ...
श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी पार पडल्या. यामध्ये बहुतेक गावात दिग्गज नेत्यांनी सरपंचपदाची सूत्रे कुटुंबात अगर भाऊकीच्या हाती देऊन घराणेशाहीच्या राजकारणाचा जागर सुरू ठेवला आहे.
वडाळी, घोडेगाव, आर्वी, अनगरेचे सरपंचपद रिक्त राहिले. तेथे आरक्षणाचा उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले. पन्नास टक्क्याहून अधिक महिला सदस्या आहेत. ४० गावाच्या सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत.
देऊळगावच्या सरपंचपदी शरद गलांडे यांनी काठावरचे बहुमत असताना सरपंचपदाचा डाव एक मताने जिंकला तर शेडगावमध्ये विजय शेंडे यांनी सूत्रे ताब्यात ठेवताना सरपंचपदाचा चावी पत्नी संध्या शेंडे यांच्याकडे दिली. उपसरपंचपद मित्र विजय रसाळ यांना दिले. टाकळी कडेवळीत रूपाली इथापे यांना सरपंचपद तर डॉ. सुभाष देशमुख यांना उपसरपंचपद देऊन इथापे-देशमुख घराण्यांनी राजकीय समतोल राखला.
येळपणेच्या सरपंचपदी विनोद धावडे तर उपसरपंचपदी बाळासाहेब पवार यांची निवड झाली. हंगेवाडीत नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक तुळशीराम रायकर यांची पत्नी साळुबाई रायकर यांना सरपंचपदाची संधी मिळाली. उपसरपंचपदी भिवा धायगुडे यांची निवड झाली.
वेळू, उक्कडगाव, सुरेगाव, म्हातारपिंप्री, चिखली, बेलवंडी कोठार, गार, चिखलठाणवाडी, ढोरजा, राजापूर, म्हसे, सांगवी दुमाला या बारा गावात सरपंच, उपसरपंचपदी महिलांना संधी मिळाली.
---
लिंपणगावात राजकीय भूकंप..
लिंपणगाव ग्रामपंचायतीत १७ पैकी १२ जागा भाजप गटाला मिळाल्या. सरपंचपदाची संधी डावलताच भाजपचे नीळकंठ जंगले यांनी बंड केले. त्यातूनच काॅंंग्रेसला चार सदस्य मिळाले. सरपंचपदी काॅंंग्रेसच्या शुभांगी सूर्यवंशी तर उपसरपंचपदी अरविंद कुरुमकर यांची शेवटच्या तासात वर्णी लागली. माजी आमदार राहुल जगताप यांनी बहुमताचे गणित जुळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
---
आढळगावात उबाळे-ठवाळ एकत्र
पत्रकार उत्तम राऊत यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद जमदाडे, जिजाराम डोळे, देवराव वाकडे या त्रिकुटाने उबाळे व ठवाळ यांचे राजकीय कनेक्शन जोडले. सरपंचपदी शिवप्रसाद उबाळे तर उपसरपंचपदी माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ यांची निवड झाली.
----
उख्खलगावात प्रथमच कोल्हाटी समाजाला संधी ..
कोल्हाटी समाजाची वस्ती असलेल्या उख्खलगावमध्ये प्रथमच कोल्हाटी समाजाची महिला कविता चंदन सरपंच झाल्या आहेत. उपसरपंचपदाची माळ प्रा. संजय लाकुडझोडे यांचे पुतणे धनंजय लाकुडझोडे यांच्या गळ्यात पडली.
---
वांगदरीत आदेश नागवडे सरपंच...
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी वांगदरीच्या सरपंचपदाची सूत्रे आदेश नागवडे तर उपसरपंचपद शिवाजी चोरमले यांना देऊन सत्ता समतोल राखला आहे.