जागरूक नागरिकांनी घातला बंद सिग्नलला चपलांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:49 PM2021-01-22T16:49:15+5:302021-01-22T16:50:11+5:30
प्रशासनाने मोठा गाजावाजा करत नुकताच रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरातच वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रशासनाच्या या कृत्रिम अभियानाचा शुक्रवारी जागरुक नागरिक मंचच्यावतीने निषेध नोंदवून शहरातील सक्कर चौकातील बंद पडलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी केली.
अहमदनगर : प्रशासनाने मोठा गाजावाजा करत नुकताच रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरातच वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रशासनाच्या या कृत्रिम अभियानाचा शुक्रवारी जागरुक नागरिक मंचच्यावतीने निषेध नोंदवून शहरातील सक्कर चौकातील बंद पडलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी केली.
यावेळी मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्यासह वसंत लोढा, प्रा.सुनील पंडित, मिलिंद मोभारकर, नितीन भूतारे, जागरूक नागरिक मंचचे सचिव कैलास दळवी, धनेश बोगावत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुळे म्हणाले २५ लाख रुपये खर्च करून उभारलेले सिग्नल गेल्या पाच वर्षंपासून बंद आहेत. कायनेटिक चौक, सक्कर चौक व स्वस्तिक चौक या गर्दीच्या ठिकाणी कायम वाहतुकीची कोंडी व अपघात होत आहेत. नगरची वाहतूक शाखा मात्र वर्धापन दिन साजरा करत आहे. प्रशासकीय अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानात केवळ फोटोशेसन करण्यातच धन्यता मानत आहेत. मागील पाच वर्षांमध्ये वाहतूक शाखेमध्ये अनेक अधिकारी येऊन गेले. महपालिकेतही अनेक लोकप्रतिनिधी व महापौर होऊन गेले, परंतु एकानेही रस्ते आणि वाहतूक नियंत्रण, ट्रॅफिक सिग्नल याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.