कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणसं कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:38+5:302021-03-18T04:19:38+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे दररोज पाच ते सहाजणांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांवर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात असून, ...
अहमदनगर : कोरोनामुळे दररोज पाच ते सहाजणांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांवर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात असून, कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारे मात्र कोरानापासून दूर आहेत. अंत्यसंस्कार करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याला कोराना झालेला नाही, असे मनपाच्या कामगारांकडून सांगण्यात आले.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या आसपासही कुणी फिरकत नाही. अगदी कुंटुंबातील व्यक्तीही त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नातेवाईकांच्या हाती न देता, प्रशासनाकडूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी महापालिकेने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी घेत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करतात. रुग्णालयातून मृतदेह शववाहिकेतून प्लास्टिकमध्ये गुंडाळून अमरधाम येथे आणला जातो. तिथे पोहोचल्यानंतर प्रवेशव्दारावर हे कर्मचारी मृतदेह शववाहिनीतून बाहेर काढून नातेवाईकांना लांबून दर्शन देतात. नातेवाईकांना प्रवेशव्दाराच्या बाहेर उभे राहण्यास सांगितले जाते. नातेवाईकही सूचनांचे पालन करतात. पीपीई किट घालूनच कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे मृतदेह हाताळतात. स्वत:ची काळजी घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असल्याने अजून तरी कुणीही कर्मचारी पॉझिटिव्ह आलेला नाही, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
...
अंत्यसंस्कारासाठी ११.३०पर्यंत मुदत
जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह साडेअकरा वाजेपर्यंतच अमरधाममध्ये पाठवले जातात. त्यानंतर मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवले जात असल्याने सर्व कर्मचारी साडेअकरापर्यंत थांबतात.
....
अंत्यसंस्काराचा भार चौघांवर
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी १८ ते २० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते. सध्या दररोज ५ ते ६ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
....
सूचना: फोटो आहे.