आयुष्यमान कार्डवाटपास आशा सेविकांचा नकार, जिल्हा परिषदेवर ठिय्या
By चंद्रकांत शेळके | Published: September 13, 2023 05:50 PM2023-09-13T17:50:31+5:302023-09-13T17:54:35+5:30
हे कार्ड काढण्याचे काम शासनाने काही खासगी एजन्सींना दिले आहे.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. परंतु हे कार्ड तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला वाटप करण्याची व आवश्यक तेथे केवायसी करण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. मूळात हे काम आशा सेविकांचे नाही, त्यामुळे ते काम शासनाने काढून घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी आशासेविकांनी जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन केले.
हे कार्ड काढण्याचे काम शासनाने काही खासगी एजन्सींना दिले आहे. हे कार्ड छपाईनंतर त्याचे वाटप करण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हे काम आशासेविकांवर सोपवले आहे. परंतु हे काम किचकट आहे. आशासेविकेने हे कार्ड देताना संबंधित लाभार्थ्याची केवायसी करायची आहे. यासाठी प्रत्येक यशस्वी केवायसीसाठी ५ रूपये व प्रती कार्ड वाटपास ३ रूपये असे आठ रूपये देण्यात येत आहेत. मूळात केवायसी प्रक्रिया मोबाईलवरून करायची आहे. त्यासाठी आशा सेविकांना कोणतेही प्रशिक्षण नाही किंवा तसे अद्ययावत मोबाईल त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हे काम त्यांना देऊ नये किया द्यायचेच असेल तर प्रती कार्ड ५० रूपये द्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या आशासेविकांनी केली.