वंचितांच्या लेकरांना निवारा देणारा बाप-अरुण जाधव; पोटासाठी भटकंती करणारे मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 07:43 PM2020-06-21T19:43:00+5:302020-06-21T19:43:27+5:30

समाज व्यवस्थेतील ही विदारक परिस्थिती अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी बालपणापासून पाहिली आणि स्वत:ही अनुभवली. वंचित घटकातील या मुलांना समाज प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले भविष्य देण्याच्या उद्देशातून जाधव यांनी २६ जून २०१५ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी जामखेड येथे आपल्या राहत्या घरी निवारा बालगृहाची स्थापना केली. सुरुवातीला ८ मुले दाखल झालेल्या या बालगृहात आज ६५ मुले-मुली वास्तव्यास आहेत.

Baap-Arun Jadhav providing shelter to the children of the deprived; Wandering for a living, children are learning lessons | वंचितांच्या लेकरांना निवारा देणारा बाप-अरुण जाधव; पोटासाठी भटकंती करणारे मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

वंचितांच्या लेकरांना निवारा देणारा बाप-अरुण जाधव; पोटासाठी भटकंती करणारे मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

अरुण वाघमोडे

अहमदनगर: एकीकडे शाळा-महाविद्यालयांत शिक्षणाचे धडे गिरविणारे विद्यार्थी.. दुसरीकडे मात्र याच समाजात राहणारे पण पोटाची भूक भागविण्यासाठी दारोदारी भीक मागणारे, चोरी करणारे तर कधी हातात गलोल घेऊन रानात पक्ष्यांच्या मागे फिरणारे भटक्या-विमुक्त कुटुंबातील मुले. या मुलांना ना स्वत:च्या आरोग्याची भ्रांत, ना शिक्षण, ना संस्कार. समाज व्यवस्थेतील ही विदारक परिस्थिती अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी बालपणापासून पाहिली आणि स्वत:ही अनुभवली. वंचित घटकातील या मुलांना समाज प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले भविष्य देण्याच्या उद्देशातून जाधव यांनी २६ जून २०१५ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी जामखेड येथे आपल्या राहत्या घरी निवारा बालगृहाची स्थापना केली. सुरुवातीला ८ मुले दाखल झालेल्या या बालगृहात आज ६५ मुले-मुली वास्तव्यास आहेत.
..................................
अरुण जाधव यांचा जन्म भटक्या विमुक्त कुटुंबात झाला. त्यामुळे बालपणापासून त्यांनी वंचितच जीनं काय असते हे अनुभवले. समाजात वावरत असताना जेव्हा काही अनाथ, निराधार, गोरगरीब, ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी कामगार, घिसाडी, वडारी, कैकाडी, वासुदेव, पिंगळा, मदारी, भिल्ल, पारधी आदी वंचित कुटुंबातील मुले शिक्षण न घेता रस्त्यावर किंवा दारोदार भीक मागताना पहायचे. तेव्हा या मुलांसाठी आपण काहीतरी करावे असे जाधव याना नेहमी वाटायचे. जाधव यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतरही कुठे नोकरी न करता पूर्णवेळ स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यानी 'ग्रामीण विकास केंद्र' या संस्थेची स्थापना करत दलित, आदिवासी, भटके-विमुक्त माझ्यातील निराधार महिला व मुलांसाठी काम सुरू केले.

सुरुवातीला निवारा बालगृहात केवळ ८ मुले दाखल झाली. या कार्यात जाधव यांना साथ दिली त्या त्यांच्या मातोश्री ज्येष्ठ लोककलावंत हिराबाई जाधव, त्यांच्या पत्नी उमाताई, भगिनी अलकाताई जाधव व संस्थेचे संचालक बापू ओहोळ यांनी. बालगृहातील आठ मुलांचा निवास, भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यात जाधव यांना बाळू कदम, बाबासाहेब डोंगरे,  शोभा कुंवर, रोहिणी जाधव, सोजरबाई जाधव, कल्पना जाधव या स्वयंसेवकांनी सुरुवातीच्या काळात मदत केली. वर्षभरातच निवारा गृहात मुलांची संख्या १४  झाली. मुलांना राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली म्हणून जाधव यांनी आपल्या कुंभारतळे येथील स्वमालकीच्या जागेत मोठा हॉल बांधला. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदीसाठी जाधव यांनी जामखेड शहरातील काही दानशूर व्यक्तींची मदत घेतली.

पुढे विद्यार्थ्यांचा खर्च वाढत गेला. संस्थेला कुठलेही शासकीय अनुदान नसल्याने जाधव यांना या वंचित मुलांसाठी समाजातून मदत गोळा करणेशिवाय पर्याय नव्हता. या कार्यात जाधव यांना अनेकांनी मदत केली तर काहींनी नाकारली. त्यांनी मात्र आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही.


निवारा बालगृहात येणाºया मुलांची संख्या जसजशी वाढू लागली तशा अडचणीही येऊ लागल्या.  वाढता खर्च भागवण्यासाठी जाधव आणि त्यांच्या सहकाºयांना दररोज नवीन दाते शोधावे लागले. प्रत्येक अडचणींवर मात करत वस्तीगृहातील मुलांच्या गरजा पूर्ण केल्या. जामखेड तालुक्यातील मोहा येथील संतोष गर्जे या तरुणाला त्यांनी सोबत घेत त्याच्याकडे बालगृहाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवली. अरुण जाधव व बापू ओहोळ यांनी सुरू केलेल्या लोकाधिकार आंदोलनाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अन्नधान्य गोळा केले. काहींनी वस्तू रुपाने मदत केली. यातून बालगृहातील मुलांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला.

बालगृहात मुलांची संख्या वाढत गेल्याने जामखेड पासून ७ किलोमीटर अंतरावर मोहा फाटा येथे लोकवर्गणीतून संस्थेसाठी दीड एकर जागा घेतली. त्या जागेवर निवारा बालगृहाची भव्य इमारत देणगी व लोकवर्गणीतून बांधण्यात आली. त्या भूमीला समताभूमी असे नाव देण्यात आले. तिथे स्वतंत्र स्वयंपाकगृह, मुलींचे निवास, मुलांचे निवास,  मुलामुलींचे स्वतंत्र स्वछतागृह व स्रानगृह तसेच कार्यालय बांधण्यात आले. मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले. २०१८ साली जामखेडमधील कुंभार तळे परिसरातील निवारा बालगृहाचे स्थलांतर मोहा फाटा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समता भूमी या ठिकाणी झाले.

२०१८  मध्ये निवारा बालगृहातील मुलांची संख्या ५० वर पोहोचली होती. तेव्हापासून तिथे दरवर्षी  'निवारा महोत्सव' या नविन कार्यक्रमाची सुरुवात केली. गेल्या ३ वर्षापासून ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह यांच्यावतीने दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, निबंध व रांगोळी स्पर्धा तालुका पातळीवर आयोजित केल्या जातात. त्यातूनच 'निराधार मुलांसाठी मूठभर धान्य' ही संकल्पना पुढे आली आणि उपक्रमांतूनही निवारा बालगृहासाठी दरवर्षी धान्य गोळा होऊ लागले.


जामखेडच्या आडत व्यापाºयाकडून धान्य तर लहू जाधव  या भाजीपाला व्यापाºयाकडून निवारा बालगृहाला भाजीपाला मिळतो. सध्या अ­ॅड. डॉ. अरुण जाधव व बापू ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक वैजिनाथ केसकर, संगीता केसकर, संतोष चव्हाण, सुशिलाताई ढेकळे, स्वातीताई हापटे इत्यादी कार्यकर्ते कामकाज पाहत आहेत.
.............................

वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रबोधन
वंचित कुटुंबांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, यासाठी अरुण जाधव हे जामखेड परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन लोकांचे प्रबोधन करत आहेत. एखाद्या कुटुंबातील मुले शिक्षण घेत नसतील तर जाधव हे स्वत: त्या मुलांना बालगृहात दाखल करून घेत आहेत. जाधव यांच्या या उपक्रमामुळे आज वंचित घटकातील अनेक मुले शिक्षण प्रवाहात आले आहेत.
.............
लोकवर्गणीतूनच सर्व काही
निवारा बालगृहमध्ये सध्या वंचित घटकातील ६५ मुले मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी बालगृहात स्टडी रूम, हॉल, ग्रंथालय, क्रीडासाहित्य, सोलर वॉटर हिटर, सौर ऊर्जेवरील दिवे शैक्षणिक साहित्य, बेंच आधी सुविधा उभारणीसाठी मदतीची गरज आहे. बालगृहाच्या स्थापनेपासून सर्व कामे पूर्णपणे लोकवर्गणी तसेच वस्तुरूप देणगीतून सुरू आहे. या शैक्षणिक वर्षात निवारा बालगृहातील मुला-मुलींची संख्या १०० च्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी निवारा बालगृहासाठी मदत करावी, असे आवाहन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अरुण जाधव यांनी केले आहे. 

Web Title: Baap-Arun Jadhav providing shelter to the children of the deprived; Wandering for a living, children are learning lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.