बबन शिंदे यांचा कोरोनावरील औषधाचा दावा आणि सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:00 PM2020-06-06T22:00:12+5:302020-06-06T22:02:59+5:30

अहमदनगरचे बबन शिंदे सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कोविड-१९ या आजाराचा मुकाबला कसा करायचा व कोरोना विषाणू कसा रोखायचा यामुळे सगळे जग चिंतेत असताना शिंदे यांनी आपल्या औषधामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करणारा दावा केला. बघता बघता त्यांचा दावा एवढा लोकप्रिय झाला की गुगलवर बबन शिंदे नाव टाकताच त्यांचे असंख्य व्हिडीओ समोर येऊ लागले. लाखो हिट्स व लाईक बबनरावांनी मिळविल्या आहेत. 

Baban Shinde's claim and truth about corona medicine | बबन शिंदे यांचा कोरोनावरील औषधाचा दावा आणि सत्य

बबन शिंदे यांचा कोरोनावरील औषधाचा दावा आणि सत्य

सुधीर लंके, आवृत्ती प्रमुख, लोकमत, अहमदनगर
--------------
अहमदनगरचे बबन शिंदे सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कोविड-१९ या आजाराचा मुकाबला कसा करायचा व कोरोना विषाणू कसा रोखायचा यामुळे सगळे जग चिंतेत असताना शिंदे यांनी आपल्या औषधामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करणारा दावा केला. बघता बघता त्यांचा दावा एवढा लोकप्रिय झाला की गुगलवर बबन शिंदे नाव टाकताच त्यांचे असंख्य व्हिडीओ समोर येऊ लागले. लाखो हिट्स व लाईक बबनरावांनी मिळविल्या आहेत. 

 


सोशल मीडिया काय करु शकतो, याचे हे एक उदाहरण आहे. शिंदे हे राज्य परिवहन महामंडळात नोकरीला होते. ते दहावी शिकलेले आहेत. नगर शहरात वैदुवाडी परिसरात राहतात. आपले वडील झाडपाला, जडीबुटी ही आयुर्वेदिक औषधे द्यायचे. वडिलांप्रमाणे आपणही गत पंधरा, वीस वर्षांपासून आयुर्वेदिक औषधे लोकांना देतो. आपणाला या औषधांचे ज्ञान आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.  


सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची व त्यामुळे होणाºया कोविड- १९ आजाराची चर्चा आहे. जगभरातील वैद्यकीय प्रयोगशाळा व औषध निर्माण कंपन्या या आजारावरील औषध शोधण्यात गुंतलेल्या आहेत. अशावेळी शिंदे यांनी दावा केला की आपणाकडील औषध यावर गुणकारी ठरु शकते. ते केवळ माध्यमांत दावा करुन थांबले नाहीत. ते जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना भेटले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत त्यांचा दावा गेला. ‘हे काय आहे हे पडताळून पहा’ अशी सूचना पालकमंत्र्यांनी करताच जिल्हा प्रशासनाने शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत खास बैठक घेऊन त्यांचे निवेदन थेट राज्यस्तरीय टास्कफोर्सला पाठविले. त्यानंतर या औषधातील घटक तपासण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना केली गेली असून ते घटक तपासण्याचे काम सध्या सुरु आहे. 


आयुर्वेदच नव्हे कुठल्याही उपचार पद्धतीत (पॅथी) औषध बनविण्याची एक शास्त्रीय पद्धत असते. आयुर्वेदात चरक संहिता, सुश्रूत संहिता व वागभट्टाचार्यांचे अष्टांग संग्रह हे जे आद्यग्रंथ आहेत त्यामध्ये वनस्पती व कोणत्या विकारांवर त्या वापरता येतात याची वर्णने आहेत. नंतरच्या काळात आयुर्वेदात जे रसशास्त्र आले त्यात खनिज व पाºयाचा वापर करुन औषधे बनविण्यास सुरुवात झाली.  याव्यतिरिक्त आणखी संशोधन करुन सध्याच्या कंपन्या जी आयुर्वेदिक औषध बनवितात त्यास ‘प्रोप्रायटरी’ मेडिसीन म्हटले जाते. सध्या कुठलाही आयुर्वेदिक औषध निर्माता या ग्रंथांच्या आधारे अथवा त्याच्या संशोधनाच्या आधारे औषध निर्माण करतो. नंतर अन्न व औषध प्रशासन विभाग या औषधातील घटक, त्यांची मात्रा तपासतो. त्यानंतर या औषधाच्या काही रुग्णांवर चाचण्या घेतल्या जातात. त्याचे निष्कर्ष तपासून हे औषध बाजारात येते. संशोधनाचे तत्व असे सांगते की या सर्व बाबी पूर्ण केल्याशिवाय व त्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय कुठल्याही औषधाबाबत दावा करणे हे अयोग्य आहे. 

-----------
बबन शिंदे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली दिसत नाही. त्यांनी प्रशासनाच्या हातात औषध सोपविले व हे कोरोनावर चालेल असा दावा करत त्याची पडताळणी करण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनानेही मूलभूत बाबी देखील न तपासता राज्यस्तरीय टास्क फोर्सपुढे हे प्रकरण पाठविले. शिंदे हे अल्पशिक्षित असले तरी त्यांना कुठलेही ज्ञान संपादन करण्याचा अधिकार आहे. विहित मार्गाने ते देखील संशोधन करु शकतात. अनेक अल्पशिक्षित लोकांनी चांगले संशोधन करुन सर्वच क्षेत्रात नवे ज्ञान जगासमोर आणल्याची उदाहरणे आहेत. शिंदे यांनीही हे औषध बनविण्यासाठी काही कष्ट केले असतील. अभ्यासही केला असेल. त्यांची धडपडही प्रामाणिक असेल. पण, कुठलाही दावा करण्यापूर्वी त्याला शास्त्रीय आधार व संस्थांची मान्यता हवीच. शिंदे यांनीही आपल्या औषधाची परिणामकारकता काय आहे ती पुराव्यांच्या आधारेच शासनासमोर मांडायला हवी. माझे अमूक एक औषध आहे व त्याची चाचपणी करा एवढेच म्हणणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. 


कोरोनाच्या रुग्णांवर कोविड सेंटर व्यतिरिक्त इतर कोठेही उपचार करता येत नाहीत. उच्चशिक्षित खासगी डॉक्टरांना देखील तो अधिकार नाही. अशावेळी बबन शिंदे यांनी हे औषध कुणावर आजमावून पाहिले? हा मूलभूत प्रश्न आहे. त्यांना झाडपाल्याची औषधे देण्याचा अनुभव आहे म्हणून त्यांचा दावा विचारात घेतला. तर असे दावे उद्या गावोगावचे सर्वच जडीबुटीवालेही करु शकतील. प्रशासनाला त्याही दाव्यांची पडताळणी करावी लागेल. त्यामुळे निराधार दावा करणे हे संशोधनाच्या संकेतांमध्ये बसणारे नाही. सध्याच्या गंभीर परिस्थितीत ते अयोग्य आहे. जगभरातील संशोधक दिवसरात्र कोरोनावरील औषधासाठी मेहनत घेत आहेत. त्या सर्वांचे प्रयत्नही अशा दाव्यांमुळे दुर्लक्षित होतात. 
---
औषध निर्माणासाठी शासनाने एक व्यवस्था निर्माण केली आहे. त्या व्यवस्थेनुसार एखादा आजार काय आहे? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? त्यावर जे औषध शोधले आहे त्याचा कार्यकारणभाव काय आहे ? हे सर्व स्पष्ट करुन परवानगी घेऊन औषधे बाजारात आणता येतात. त्यामुळे कुठलाही दावा करण्यापूर्वी एमसीआयएम, आयसीएमआर, आयुष मंत्रालय या सर्व संस्थांकडे तपशीलवार संशोधन देऊन त्यांच्याकडून औषधांबाबत शिक्कामोर्तब करुन घेणे आवश्यक आहे. संशोधनाची कार्यप्रणाली न पाळता औषधांबाबत दावे करणे नियमबाह्य व चूक आहे. सर्व नितीनियमच यामुळे पायदळी तुडविले जातात.  

- डॉ. आशुतोष गुप्ता, 
अध्यक्ष, महाराष्टÑ कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीन (एमसीआयएम) 

Web Title: Baban Shinde's claim and truth about corona medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.