नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:13 PM2020-05-17T12:13:34+5:302020-05-17T12:14:39+5:30
अहमदनगर शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.
अहमदनगर : शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.
नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र भागातून बाहेर पडायला तयार नाहीत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्थापन केलेल्या सुरक्षा समितीचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे वाकळे हे प्रभागाचे महापौर आहेत की शहराचे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरावरील कोरोनाचे संकट गडद झाले आहे. एकापाठोपाठ एक रुग्ण सापडत आहेत. महापालिकेकडून उपाययोजनाही सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर बाबासाहेब वाकळे हे प्रभाग क्रमांक सहाचे नेतृत्व करतात. त्यांनी गुरुवारी त्यांच्या प्रभागातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. ही बैठक त्यांनी सोशल डिस्टन्स पाळून घेतली. इतर प्रभागांतील समित्यांचे काय सुरू आहे ? याचा मात्र महापौरांना अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. वाकळे हे आपल्याच प्रभागातील कामे मार्गी लावण्यात व्यस्त असतात, अशी त्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. इतर प्रभागात मात्र ते फारसे लक्ष देत नाहीत. त्यात कोरोनाच्या संकट काळातही ते आपल्याच प्रभागात तळ ठोकून आहेत. म्हणूनच वाकळे हे शहराचे महापौर आहेत की त्यांच्या प्रभागाचे असा प्रश्न निर्माण होतो.
सिद्धीबागेसमोरील गटारीचा प्रश्न, वादळी पावसात शहरात अनेक ठिकाणी झालेले नुकसान, बाहेरून शहरात लोक येत आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून शहरातील लोकांना भिती निर्माण झाली आहे. प्रभागातील लोकांना त्यांनी अन्नधान्य वाटप केले? पण शहरातील नागरिकांना काही अडचणी तर नाहीत ना? याकडे पहायला मात्र महापौरांना वेळ मिळेनासा झाला आहे. महापालिकेला कल्पक व कृतीशील आयुक्त लाभले आहेत. मात्र त्यांच्यासोबत बसून शहरातील सर्व ठाकठीक करण्यासाठीही त्यांना वेळ मिळेना असे दिसते आहे. शहरात भाजीपाला विक्रीला अद्यापही शिस्त आलेली नाही. याबाबत चौकोन आखायलाही महापालिकेला वेळ मिळाला नाही की महापौरांना लक्ष घालायला वेळ मिळाला नाही. चितळे रोड, डाळ मंडईत रोजच फिजिकल डिस्टन्सिगचा फज्जा उडतो. मात्र तिथे महापालिकेचे कोणतेही पथक अत्तापर्यंत गेलेले दिसून आले नाही. अशा कितीतरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. मात्र त्याला उत्तर कोण देणार? हाच खरा प्रश्न आहे.