धामणगाव आवारी येथे बबट्याचा बछडा आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 11:06 AM2020-05-02T11:06:42+5:302020-05-02T11:08:12+5:30
अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला.
अकोले : तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला.
बिबट्याच्या बछड्याला पाहताच पापळ हे सुरुवातीला ते डचकले. मात्र तत्काळ आपला मोबाईल काढून या गोंडस बछड्याची छबीही त्यांनी टिपली. दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब पापळ हे याच ठिकाणी आपल्या मका शेतात गेले असता त्या ठिकाणी बिबट्याची डरकाळी त्यांना ऐकू आली होती. त्यानंतर ते दोन दिवस तिकडे फिरकले नाहीत. मात्र शनिवारी ते आपल्या शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक मका पिकात बिबट्याचा बछडा दिसून आला. या परिसरात बिबट्याची मादी नक्की असेल म्हणून त्यांनी तत्काळ तेथून काढता पाय घेतला. कारण आपल्या पिल्लांची देखभाल करताना बिबट्या मादी अधिक आक्रमक होऊ शकते असेही पापळ यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाला त्यांनी याबाबत कळविले आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.