हुंड्यासाठी पळविले आजोबांनी बाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:48 AM2018-02-05T03:48:23+5:302018-02-05T03:48:26+5:30
मुलीच्या सासरच्या मंडळींनी लग्नात ठरलेला हुंडा न दिल्याने नात पळविल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उघड झाला आहे.
जामखेड (जि. अहमदनगर) : मुलीच्या सासरच्या मंडळींनी लग्नात ठरलेला हुंडा न दिल्याने नात पळविल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उघड झाला आहे. मुलगी ऊस तोडणीला गेल्यानंतर आजोबांनी तिचे पाच दिवसांचे बाळ पळविले होते.
विशेष म्हणजे बाळाच्या आईने आपल्या वडिलांविरोधात जामखेड न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई केली, अशी माहिती लोकाधिकार आंदोलनाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष बाजीराव गंगावणे यांनी दिली.
जामखेड पोलिसांनी जेऊर येथे जाऊन पंडराव पाहुण्या काळे यांच्याकडून बाळ ताब्यात घेतले व पुन्हा आईच्या कुशीत स्वाधीन केले. मुलीला पाहताच आई गहिवरली. आदिवासी समाजात वर पक्षाकडून वधूच्या वडिलांना हुंडा देण्याची पद्धत आहे. कीर्ती पवार ही पती अशोक याच्यासोबत ऊस तोडणीसाठी जेऊरला गेली होती. तेथे तिची प्रसुती झाली. हुंड्याचे पाच हजार रुपये दिले नाही म्हणून कीर्तीचे वडील पंडराव यांनी बाळाला पळविले होते. बाळाबाबत तक्रार नसल्याने कोणतीही कारवाई केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.