रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड
By Admin | Published: September 16, 2014 11:57 PM2014-09-16T23:57:45+5:302024-06-04T17:54:18+5:30
संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला सापळा रचून पकडले.
संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले.
सचिन रघुनाथ शिंदे यांनी रहिमपूर हद्दीतील प्रवरा नदीपात्रामधील घेतलेल्या वाळू उपसा लिलावाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. परंतु भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अचानक झालेल्या पावसाने प्रवरेला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे सुरू असलेला वाळूचा उपसा थांबवावा लागला. दरम्यान लिलावाप्रमाणे संपूर्ण वाळू काढता न आल्याची बाब शिंदे यांनी तलाठी गडदे याच्या निदर्शनास आणून दिली. तसेच रितसर पंचनामा करून उर्वरित वाळू पाणी ओसरल्यावर काढणार असल्याचे सांगितले. परंतु तसे करण्यासाठी गडदे याने शिंदे यांच्याकडे १० हजाराची मागणी केली. दरम्यान शिंदे यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपतचे निरीक्षक विजय मुर्तडक, चंद्रशेखर सावंत, हेड कॉन्स्टेबल वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, नितीन दराडे, प्रमोद जरे, सुनील पवार, राजेंद्र सावंत, एकनाथ आव्हाड, श्रीपाद ठाकूर व पथकाने पंचायत समितीनजीक सापळा लावला. शिंदे यांच्याकडून १० हजाराची लाच घेताना पथकाने गडदे यास रंगेहाथ पकडले.
मतदार नोंदणीसाठी आज अखेरचा दिवस
अहमदनगर: विधानसभा निवडणूक मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस आहे़ अखेरच्या दिवशी जिल्हाभर मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे़ नागरिकांनी या मोहिमेंतर्गत नाव नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले आहे़
मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असते़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख ४ हजार ३५३ झाली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे़ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते़ त्यानुसार नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटची संधी असून, मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे़ दि़ १ जानेवारी २०१४ रोजी वय १८ वर्षे झाले आहे़ परंतु अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी म्हणून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़
श्रीरामपूर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात ही मोहीम राबविली जाणार आहे़ मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी केली जाणार आहे़ नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदार नोंदणी करावी़ संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील़ नागरिकांनी क्रमांक- ६ चा अर्ज घेऊन नाव नोंदणी करावी़ विधानसभा निवडणुकीत ज्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांनी विशेष मोहिमेंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन कवडे यांनी केले आहे़