संचालकांची वार्षिक सभेकडे पाठ : अहमदनगर जिल्हा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:30 PM2018-09-08T14:30:33+5:302018-09-08T14:30:42+5:30

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या ६१ व्या वार्षिक सभेकडे ज्येष्ठ संचालक यशवंतराव गडाखांसह अनेक संचालकांनी ...

Back to the annual meeting of directors: Ahmednagar District Bank | संचालकांची वार्षिक सभेकडे पाठ : अहमदनगर जिल्हा बँक

संचालकांची वार्षिक सभेकडे पाठ : अहमदनगर जिल्हा बँक

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या ६१ व्या वार्षिक सभेकडे ज्येष्ठ संचालक यशवंतराव गडाखांसह अनेक संचालकांनी पाठ फिरविली.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३५ कोटी ७७ लाख रूपये नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना दिली. तसेच भागधारकांना ९ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. त्यासाठी १९ कोटी ६७ लाख रूपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
३१ मार्च २०१८ अखेर १०५२.३३ कोटी रूपयांचे अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले असून या कर्जाची १५५६.०८ कोटी, तर ६५९.५९ कोटी रूपये येणे बाकी आहे. एकूण कर्ज व्यवहाराच्या रकमेपैकी १३८९.२५ कोटींचे कर्ज सहकारी साखर कारखान्यांना दिले आहे. हे प्रमाण बँकेच्या एकूण कर्ज पुरवठ्याच्या ३४.०८ टक्के इतके आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना संपलेल्या आर्थिक वर्षात ५.९१ कोटी कर्जवाटप केले असून ५.६८ कोटी येणे बाकी आहे. ३१ मार्च २०१८ अखेर सर्व बचतगटांकडे सर्व प्रकारची एकूण ११.८५ कोटी येणे बाकी आहे.
आमदार शिवाजी कर्डिले, अरूण जगताप, मोनिका राजळे, यशवंतराव गडाख, चंद्रशेखर घुले, बिपीन कोल्हे, करण ससाणे, सुरेश करपे हे संचालक गैरहजर होते.
उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी प्रास्ताविक केले. वैभव पिचड, पांडुरंग अभंग, अरूण तनपुरे, बाजीराव खेमनर, उदय शेळके, राजेंद्र नागवडे, रावसाहेब शेळके, मीनाक्षी साळुंके, चैताली काळे, अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात आदी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते. दत्तात्रय पानसरे यांनी आभार मानले.
शिवाजी वाळुंज, मारूती लोखंडे, शांताराम वाळुंज, दिलीप चौधरी, मुक्ताजी पानगव्हाणे, शिवाजी पाचपुते, शिवाजी थोरात, पंडित गायकवाड, रामनाथ राजपुरे, अण्णासाहेब बाचकर व इतर सभासदांनी यावेळी विविध सूचना केल्या.

बँकेची २०१७-१८ ची आर्थिक स्थिती (आकडे कोटी रूपयांमध्ये )
स्वभांडवल ........... ७८१.९८
ठेवी.................... ६२२२.७१
बाहेरील कर्जे......... ४४०.०४
गुंतवणूक ............ २९९१.००
दिलेली कर्जे......... ४०७६.००
नफा.................. ३५.७७
खेळते भांडवल...... ७७४६.७६

१ टक्के व्याज दर सवलत
विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या कर्जदार सभासदांनी मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाची नियमित परतफेड केल्यास १ टक्के, सहकारी साखर कारखान्यांना १ टक्के, थकबाकी नसणाऱ्या व नियमित कर्ज परतफेड करणाºया पगारदार नोकर संस्था, नियमित कर्ज परतफेड करणाºया व थकबाकी नसणाºया खरेदी विक्री सहकारी संघ व जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थांना १ टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.  याशिवाय बीपीएल गटांना ३ टक्के व एपील गटांना ७ टक्के व्याजदर सवलत देण्यात आली आहे.
भूजल प्रारूपास विरोध

ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के यांनी नोटाबंदी, कर्जमाफीसारख्या अडचणींवर मात करून बँकेने ३५ कोटींचा नफा मिळविल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. शेतकºयांना व्याजात सवलत देण्याचा सेवा संस्थांनी प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भूजल कायद्याच्या प्रारूपास विरोध करणारा आयत्या वेळचा ठराव त्यांनी मांडला. तो सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
नोकरभरतीचा विषय
अशोक गायकवाड यांनी बँकेची नोकरभरती वादग्रस्त होऊन गाजल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. पण प्रत्यक्ष बँकेच्या शाखांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे निवडलेल्या कर्मचाºयांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, मागासवर्गीय कर्मचाºयांना नियमानुसार तत्काळ पदोन्नती द्यावी, अशा मागण्या केल्या.

Web Title: Back to the annual meeting of directors: Ahmednagar District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.