वाळू साठ्यांच्या लिलावाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:40+5:302021-01-22T04:19:40+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील १५ वाळू घाटांसाठी एक जानेवारीपासून लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, एका घाटाचा लिलाव वगळता या ...
अहमदनगर : जिल्ह्यातील १५ वाळू घाटांसाठी एक जानेवारीपासून लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, एका घाटाचा लिलाव वगळता या प्रक्रियेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. एकीकडे दोन वर्षांपासून वाळू लिलाव होत नसल्याने वाळू मिळत नसल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे लिलाव प्रक्रिया राबवूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२०२०-२१ या वर्षासाठीच्या ६ जून २०२१ या सहा महिन्यांच्या मुदतीसाठी वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. वाळू घाटांची ई-निविदा प्रक्रिया असून, त्यामध्ये ठेकेदारांनी ई-लिलाव पद्धतीने सहभागी व्हायचे आहे. निविदा दाखल करणे आणि लिलावात सहभागी होणे या दोन्ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्या. वाळू लिलावासाठी १५ घाट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी सोनारी-कोळगावथडी या घाटाचा लिलाव झाला असून, अण्णासाहेब रंगनाथ थोरात (जोर्वे) यांनी या घाटासाठी सर्वाधिक १ कोटी ८६ लाख २७ हजार २५० रुपयांची बोली लावली होती. या घाटासाठी प्रशासनाने १ कोटी ६० लाख १७ हजार २५० रुपयांची हातची किंमत (बोली) जाहीर केली होती.
प्रतिसाद न मिळालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खु.- नायगाव (१ व २), मातुलठान (घाट क्रमांक १, २ आणि ३), कोपरगाव तालुका- कोकमठाण व संवत्सर, जेऊर कुंभारी व जेऊर पाटोदा, राहुरी तालुका- राहुरी खुर्द, पिंप्री वळण, चंडकापूर, वळण, रामपूर, सात्रळ, राहाता तालुका- पुणतांबा, रस्तापूर येथील रेती घाटांसाठी दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया २२ जानेवारी सुरू होणार असून, या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशसनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ का फिरवली? याचे नेमके कारण सांगता येत नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.