गावाकडचे परमिटरूम बियरबार पुन्हा तर्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:36 PM2018-04-06T13:36:01+5:302018-04-06T13:46:52+5:30
गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील सर्वच बंद दुकाने सुरू होण्याच्या मार्गावर असून, कोणत्याही परिस्थितीत बंद दुकाने सुरू करायचीच, असेच शासनाच्या आदेशातून ध्वनित होत आहे.
अण्णा नवथर
अहमदनगर : गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील सर्वच बंद दुकाने सुरू होण्याच्या मार्गावर असून, कोणत्याही परिस्थितीत बंद दुकाने सुरू करायचीच, असेच शासनाच्या आदेशातून ध्वनित होत आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी न्यायालयाच्या आदेशाने अवकळा आलेली गावोगावची दारुची दुकाने पुन्हा तर्राट होणार असल्याचे बोलले जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४ एप्रिल २०१७ रोजी राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील शहरी व ग्रामीण भागातील परमिटरुम व बियरबारला टाळे ठोकण्यात आले होते. मद्यविक्रेत्यांनी या निर्णयाला आव्हान दिले, त्यावरील सुनावणीत शहरी भागातील दुकाने पुन्हा सुरू करण्यास मुभा मिळाली. ग्रामीण भागातील दुकानांबाबत मात्र निर्णय झाला नव्हता. जिल्ह्यातील २८२ दारुची दुकाने बंद आहेत. शासनाच्या गृहखात्याने ३१ मार्च रोजी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. तो राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील बंद पडलेल्या दारू विक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. बंद पडलेली दुकाने सुरू करताना पाच हजार लोकसंख्येची अट असली तरी त्यास अनेक पर्याय आहेत. त्यामुळे बंद पडलेली जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरू होतील, अशी स्थिती आहे.
शासनाचे परवानाधारक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. यापैकी एक पर्याय पूर्ण करणाऱ्यांनाही दुकान सुरू करता येणार आहे.
- ग्रामीण भागातील दारु विक्री परवान्यांचे नूतनीकरणाबाबत शासनाने ३१ मार्च रोजीच्या आदेशाने परवानगी दिली आहे. यासंदर्भात निकष पूर्ण करणा-या गावांची जिल्हा परिषदेकडून माहिती मागविण्यात आली आहे. - पराग नवलकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
ग्रामरक्षक दलाची स्थापना
नगर - ५
पारनेर - १
श्रीरामपूर - २३
राहुरी - ३७
राहाता - ४
शेवगाव -२४
पाथर्डी - ४
संगमनेर - १
अकोले -१७