भाविकांविना बायजामाता यात्रोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:06+5:302021-05-28T04:16:06+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामातेच्या यात्रोत्सवाला वैशाख बुद्ध पौर्णिमेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव ...
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामातेच्या यात्रोत्सवाला वैशाख बुद्ध पौर्णिमेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकांविना यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
जेऊर गावचे आराध्य दैवत देवी बायजामाता यात्रोत्सव दरवर्षी वैशाख बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु, मागील वर्षापासून कोरोनाने कहर केल्याने आठवडे बाजार व यात्रोत्सव रद्द करण्याचे आदेश प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बुधवार (दि. २६) पासून सुरू झालेला यात्रोत्सव भाविकांविना सुरू झाला आहे. येथील यात्रोत्सव तीन दिवस चालत असून राज्यात प्रसिद्ध आहे. पहिल्या दिवशी देवीला गंगेच्या पाण्याचा अभिषेक करून यात्रेला सुरुवात होते. नंतर कावड मिरवणूक, पालखी (छबिना) मिरवणूक, शोभेची दारू, लोकनाट्य कार्यक्रम आयोजित केला जातो. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी हंगामा व वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.
येथील वांगे-भाकरीचा महाप्रसाद हे यात्रेचे वैशिष्ट्य असते. यात्रोत्सव काळात विविध सामाजिक, धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव रद्द करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. देवीला यात्रेसाठी गंगेच्या पाण्याचा अभिषेक घालण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पायी कावडीने पाणी आणण्यासाठी प्रवरासंगम येथे मोठ्या उत्साहाने जात असतात. यात्रोत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भक्त, भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला असला तरीही गावाने सालाबादप्रमाणे होणारी परंपरा जपत सर्व पूजा व देवीचे धार्मिक कार्यक्रम पार पाडले. यावेळी मात्र कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मर्यादित तरुणांनी पायी कावडीने पाणी आणुन देवीला अभिषेक घालण्यात आला. ठराविक लोकांच्या उपस्थितीत देवीची पुजा, आरती तसेच पालखी दर्शन असे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडत गावाने यात्रोत्सव काळातील परंपरेचे जतन केले.