बाळ बोठे याचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:27+5:302021-09-23T04:23:27+5:30
बदनामी होण्याच्या भीतीतून बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांचे हत्याकांड घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ...
बदनामी होण्याच्या भीतीतून बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांचे हत्याकांड घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुपारी मिळाल्यानंतर मारेकऱ्यांनी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात गळा चिरून जरे यांची हत्या केली होती. या घटनेनंतर फरार झालेला बोठे शंभर दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागला होता. सध्या तो पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात जामिनासाठी बोठे याने १४ जुलै रोजी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. बोठे याच्या वतीने न्यायालयात ॲड. महेश तवले यांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी युक्तिवाद केला. ॲड. यादव यांना ॲड. सचिन पटेकर यांनी सहकार्य केले. जरे यांच्या हत्येच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर आणले आहेत. जामीन मिळाला तर आरोपी फरार होऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. बोठे याचे रेखा जरेंशी वितुष्ट आल्यानंतर त्याने कट रचून शांत डोक्याने त्यांची हत्या घडवून आणली आहे. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने बोठे शंभरपेक्षा जास्त दिवस तेलंगणा राज्यात लपून बसला होता. एकंदरित आरोपीचे वर्तन लक्षात घेता त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. यादव यांनी केला होता.
------------------
असा रचला होता हत्याकांडाचा कट
बोठे याने सागर भिंगारदिवे याला हाताशी धरून जरे यांच्या हत्येचा कट रचला. २४ नोव्हेंबर करंजी घाटात जरे यांच्या कारचा अपघात घडवून घातपात करण्याचे ठरले. मात्र, आरोपींचा हा डाव फसला. त्यानंतर ३० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. बोठे याने या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी दिली. भिंगारदिवे याने हे काम आदित्य सुधाकर चोळके याला दिले. चोळके याने फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे या मारेकऱ्यांना सुपारी दिली. ३० नोव्हेंबर रोजी या दोघांनी जरे यांची हत्या केली. ३० नोव्हेंबर रोजी बोठे हा जरे यांच्या संपर्कात राहून आरोपींना त्यांचे लोकेशन देत होता. या हत्याकांडात ऋषीकेश वसंत पवार याचाही सहभाग होता. हा सर्व घटनाक्रम पोलीस तपासात समोर आला आहे.