निळवंडेतून धरणातील एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही - आमदार बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:41 PM2018-04-17T17:41:24+5:302018-04-17T18:10:13+5:30
निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तळेगाव दिघे: निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
थोरात म्हणाले, राज्यातील निळवंडे हे एकमेव असे धरण आहे की, ज्याचे काम पूर्ण होण्याअगोदर संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आपण केले. आता पाण्यावर कुणीही राजकारण करू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नका. मनातील किल्मिश काढून टाका. बाकी राहिलेले काम आपल्यालाच करावे लागणार आहे. पाण्यासाठी तुमच्याबरोबर कुठेही यायला मी तयार आहे?, असे आश्वासन थोरातांनी आंदोलकांना दिले. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, आमदार थोरात कधीही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड आले नाहीत. निळवंडेच्या कामात कोणीही राजकारण आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बाबा ओहळ, महेंद्र गोडगे, गणपत सांगळे, मच्छिंद्र दिघे, रमेश दिघे, राजेंद्र भडांगे, सरपंच बाबाजी कांदळकर, गणेश दिघे यांची यावेळी भाषणे झाली. आंदोलनात संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपसरपंच अनिल कांदळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या पद्मा थोरात, जे. डी. दिघे, हरिश चकोर, अविनाश सोनवणे, तुकाराम दिघे, हौशिराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर हे प्रमुख नेते सहभागी झाले होते. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतक-यांपेक्षा परिसरातील कार्यकर्तेच आंदोलनात मोठ्या प्रमाणात दिसत होते. आंदोलनस्थळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीस अडथळा आला नाही.
पाणी पळविण्याचे षडयंत्र
संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी आ.थोरातांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. कालव्यांची कामे त्वरित सुरू करा, कोपरगाव, शिर्डी, राहाता शहरांसाठी पाणी पळविण्याचे षडयंत्र थांबवा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.