बळीराजा सुखावला अन् दु:खावलाही, गायीला मिळाली 1 लाख 61 हजारांची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:09 PM2021-07-30T19:09:56+5:302021-07-30T19:12:10+5:30
विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता.
अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथील रहिवासी अरूण रघुनाथ कदम यांची एच एफ होस्टेन दुसऱ्या वेताच्या पाच वर्षे वयाच्या गायीची गुरुवारी विक्री करण्यात आली. यावेळी, या गायीसाठी तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांची किंमत मिळाली आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत गाय खरेदी केली आहे.
विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता. याबाबत बोलताना कदम म्हणाले की, मागील वेतामध्ये गायीने २७ लिटर दूध दिले होते. या वेळेला ३० लिटरच्या पुढे गाय दुध देईल. गोठ्यात सर्व एच. एफ. होस्टेन जातीच्या गायी असून खाद्य, चारा, पोषक घटकांचा समावेश वेळोवेळी खुराकामध्ये केलेला असतो. एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलेली असल्याने मेहनतीच्या जोरावर भरघोस ऊत्पन मिळत आहे.
कोपरगाव - कुंभारीत मिरवणूक काढून केली गायीची पाठवणी pic.twitter.com/j8uigGriDc
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2021
यावेळी कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन, व्यापारी सिकंदर पठाण व अरुण कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधून सत्कार केला. दरम्यान गाईचा सांभाळ केलेल्या कदम कुटुंबीयांनी गळ्यात पडत साश्रूनयनांनी दिलेला निरोप बघता गावकरीही भावूक झाले होते.