बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 05:10 PM2018-09-16T17:10:26+5:302018-09-16T17:10:48+5:30
दि़ कोपरगाव पिपल्स को़ आॅपरेटेटिव्ह बँकेच्या शहरातील गंजबाजार शाखेत बनावट सोने तारण ठेवून ४ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर: दि़ कोपरगाव पिपल्स को़ आॅपरेटेटिव्ह बँकेच्या शहरातील गंजबाजार शाखेत बनावट सोने तारण ठेवून ४ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद शफाखत बशीद (वय ३० रा. कोठला, नगर) व अजरूद्दीन शफी शेख (वय २८ रा. केडगाव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी बँके शाखेचे व्यवस्थापक विद्यानंद विनायक रसाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शफाखत बशीद याने शनिवारी बँकेत ५५ ग्रॅम सोने तारण ठेवून १ लाख रूपयांचे कर्ज घेतले. यावेळी रसाळ यांनी सय्यद याची फाईलची तपासणी केली. यामध्ये सय्यद याने ४, ७ व १४ आॅगस्ट रोजी सोने तारण ठेवून ३ लाख १० हजार रूपयांचे कर्ज घेतल्याचे निदर्शनास आले. सय्यद याने तारण ठेवलेल्या सोन्यावर रसाळ यांना संयश आला. सय्यद याचा मित्र अजरूद्दीन शेख याचीही फाईल पाहिली तेव्हा त्यानेही २९ व ३० आॅगस्ट रोजी बँकेत १०१ ग्रॅम सोने तारण ठेवून १ लाख ८० हजार रूपयांचे कर्जत घेतले होते. रसाळ यांनी बँकेचे सोने तपासणारे संजीव शहा यांना बोलावून सय्यद व शेख यांनी तारण ठेवलेल्या सोन्याची तपासणी केली तेव्हा हे सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या फाईलवर तुमची स्वाक्षरी असल्याचे सांगत रसाळ यांनी शेख व सय्यद यांना बँकेत बोलावून घेतले. दरम्यान या घटनेबाबत कोतवाली पोलीसांना माहिती देण्यात आली होती. पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरिक्षक चव्हाण हे करत आहेत.