बँक आॅफ महाराष्ट्रची पावणेदोन कोटींची फसवणूक; नगरमधील चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:57 PM2018-02-06T18:57:18+5:302018-02-06T19:02:33+5:30
कागदोपत्री कंपनीची स्थापना करून यंत्रसामग्री घेण्याच्या नावाखाली कर्जप्रकरण करून चौघांनी बँक आॅफ महाराष्ट्रची तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर : कागदोपत्री कंपनीची स्थापना करून यंत्रसामग्री घेण्याच्या नावाखाली कर्जप्रकरण करून चौघांनी बँक आॅफ महाराष्ट्रची तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर के. अरविंद पांडुरंग शेणॉय यांनी तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे.
या फसवणूकप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मे़ अश्विनी हर्बल या फर्मचा प्रसाद बाळासाहेब गुंड याच्यासह श्री साईराज एन्टप्रायजेसचा मॅनेजिंग डायरेक्टर अमोल गाडेकर, तर नगर तालुका पोलीस ठाण्यात मे. टिटानियम एनर्जी कार्पोरेशनचा भागीदार खंडू निवृत्ती कांडेकर, संतोष भानुदास गायकवाड व प्रसाद गुंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कांडेकर व गायकवाड यांनी मे़ टिटानियम एनर्जी कंपनीसाठी यंत्रसामग्री खरेदी करावयाची असल्याचे सांगत बँक आॅफ महाराष्ट्रच्या नेप्ती शाखेत ९५ लाख रुपयांचे कर्जप्रकरण दाखल केले़ बँकेतील अधिका-यांनी कागदपत्रांची खातरजमा करत ९ सप्टेंबर २०१४ रोजी ९५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले़ तसेच १० सप्टेंबर रोजी कंपनीच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी यंत्राचा विक्रेता श्री साईराज एन्टरप्राईजेसचा संचालक प्रसाद गुंड याच्या नावे ८० लाख रुपये वर्ग केले़ त्यानंतर बँकेच्या अधिकारी कंपनीचे ठिकाण असलेल्या सुपा औद्योगिक वसाहतीत भेट दिली, तेव्हा तेथे मशीन खरेदी केलेल्या नव्हत्या. कंपनीचे कामही बंद होते़ फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर शेणॉय यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली.
कर्ज घेण्यासाठीच कंपनीची स्थापना
मे. टिटानियम एनर्जी कंपनीसाठी घेतलेल्या कर्जप्रकरणात श्री साईराज एन्टरप्राईजेसचा संचालक म्हणून समोर आलेला प्रसाद बाळासाहेब गुंड यांनी २०१५ रोजी मे. अश्विनी हर्बल कंपनीच्या नावाखाली बँक आॅफ महाराष्ट्रच्या नगर शहरातील चितळे रोड येथील शाखेतून ९८ लाख रुपयांचे कर्जत घेत फसवणूक केली. याप्रकरणी बँकेचे के. अरविंद पांडुरंग शेणॉय यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुंड याच्यासह अमोल गाडेकर यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.