साखरेच्या गोदामांवर बँक अधिकाऱ्यांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:49+5:302020-12-22T04:19:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या माल तारण कर्जाची वसुली सुलभ होण्यासाठी साखरेच्या ...

Bank officials guard sugar warehouses | साखरेच्या गोदामांवर बँक अधिकाऱ्यांचा पहारा

साखरेच्या गोदामांवर बँक अधिकाऱ्यांचा पहारा

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या माल तारण कर्जाची वसुली सुलभ होण्यासाठी साखरेच्या गोदामांवर बँकेने पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे तसा अतिरिक्त पदभार दिला जात होता. मात्र, यंदा साखर कारखान्यांना सुमारे २ हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज वितरण केल्यामुळे वसुलीच्या दृष्टीने प्रथमच थेट साखरेच्या गोदामांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना यंदा जिल्हा बँकेकडून मोठा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. यापूर्वी काही कारखाने राज्य सहकारी बँकेकडून उचल घेत होते. मात्र, यंदा जिल्हा बँकेने कारखान्यांना साखरेच्या बाजारभावानुसार पोत्यामागे ८५ टक्के रकमेचे माल तारण कर्ज वितरण केले आहे. त्यानुसार कारखान्यांना दोन हजार ६३५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.

साखर कारखान्यांची आर्थिक उलाढाल आता वाढली आहे. चालू हंगाम गाळपाच्या दृष्टीने मोठा आहे. त्यामुळे केवळ नियंत्रण राहण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली आहे. त्यामुळे कर्ज वसुलीत सुसूत्रता येणार आहे, अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी लोकमतला दिली.

कारखान्यांच्या गोदामातून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या साखरेच्या पोत्यातून जिल्हा बँकेच्या कर्जाची तात्काळ वसुली केली जाते. त्यामुळे गोदामातील साखरेच्या साठ्यावर देखरेख करण्याचे काम या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. यापूर्वीही राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँकेकडून कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शाखाधिकाऱ्यांकडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, बँकेचे दैैनंदिन काम सांभाळून हे कारखान्याचे काम पेलने कठीण जात होते. त्यामुळेच पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एखाद्या कारखान्याकडून साखरेची परस्पर विक्री होऊ नये, तसेच कर्ज वसुलीसाठी नोटीस, जप्ती वगैरे प्रकार उद्भवू नये, त्याकरिता ही खबरदारी घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

----------

जिल्हा बँकेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपये कर्जाचे वितरण केले आहे. त्यामुळे हा मोठा व्यवहार पाहण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी ही नियुक्ती आहे.

-रावसाहेब वर्पे, कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी बँक

Web Title: Bank officials guard sugar warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.