भाजपाची ‘अशी ही बनवाबनवी’- बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:05 PM2017-09-04T15:05:14+5:302017-09-04T15:11:08+5:30
श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत ...
श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत गेल्यावर मांजर होते. शेतक-यांना कर्जमाफी देतानाही अटी, शर्ती टाकून सरकारने बनवाबनवी केली आहे़ याविरोधात २६ सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी दिला़
श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एल्गार शेतकरी मेळाव्यात आ. कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते़.
कडू म्हणाले, सध्या कोणत्याच पक्षाला ना ध्येय, ना धोरण आहे़ नेत्यांमध्ये सेवेचा भाव राहिलेला नाही़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मरण होत आहे़ मंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा बनला आहे़
प्रहार संघटना ही जात, धर्माच्या नावाखाली उभी राहिलेली नसून जनतेला सेवा आणि सामर्थ्य देण्याच्या हेतूने उभी राहिली आहे़ मला श्रीमंत कार्यकर्त्यांची गरज नाही़ शेतकरी, दिन, दलित, अपंगाच्या प्रश्नावर लढणा-या कार्यकर्त्यांची गरज आहे़
मोदी, तेंडुलकरवर टीका
रामरहीमसारख्या पाखंडी बाबांच्या पायावर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस डोकं टेवकतात. अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबाला वर्षा बंगल्यावर आणून अभिषेक घातला. सचिन तेंडुलकरने या बाबांच्या अंगावर शाल चढविली, त्या तेंडूलकरचा शेतक-यांच्या मुलांनी जयजयकार केला़ मात्र, तेंडुलकरने एखाद्या शेतक-याच्या खांद्यावर शाल का चढविली नाही, असा टोला आ़ बच्चू कडू यांनी मारला.