संकटकाळी कोरोना बाधितांना ‘वात्सल्य’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:28+5:302021-04-29T04:15:28+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील खासगी कोविड सेंटरमध्ये खेड्यापाड्यातील अनेक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. येथील सर्वसामान्य ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील खासगी कोविड सेंटरमध्ये खेड्यापाड्यातील अनेक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. येथील सर्वसामान्य रुग्णांची अनेकदा जेवणाची गैरसोय होते. अशावेळी हातगाव येथील वात्सल्य प्रतिष्ठानने रुग्णांना निशुल्क जेवणाचा डबा पोहोच करण्याचा निर्णय घेत वात्सल्यरूपी मदतीचा हात पुढे केला आहे.
हातगाव (ता. शेवगाव) येथील निलेश बाबासाहेब ढाकणे हे वात्सल्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी योगदान देत असतात. महाराष्ट्र सुरक्षा दलातील शासकीय नोकरी सोडून आईच्या स्मरणार्थ त्यांनी हातगाव येथे गोशाळा सुरू केलेली आहे. कोरोनाच्या संकटात मंगळवारी सकाळी निलेश ढाकणे यांनी बोधेगाव येथील खासगी कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी याठिकाणी उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून ‘काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत’ असे म्हणत धीर दिला. त्याचबरोबर येथे उपचार घेत असलेल्या जवळपासच्या खेड्यापाड्यातील बाधित रुग्णांना जेवणाची गैरसोय होत असेल तर त्यांच्यासाठी वात्सल्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत जेवणाचा डबा पोहोच करण्याचा निर्णय घेतला.