रूग्णांमधील नकारात्मक भावना कमी करण्यासाठी योगाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:20 AM2021-05-14T04:20:03+5:302021-05-14T04:20:03+5:30
लोणी : कोविडची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी प्रवरा कोविड सेंटरमध्ये योगासन आणि प्राणायामचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले ...
लोणी : कोविडची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी प्रवरा कोविड सेंटरमध्ये योगासन आणि प्राणायामचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून रुग्णांमधील नकारात्मक भावना कमी करण्याचा प्रयत्न येथील रूग्णांसाठी लाखमोलाचा ठरत आहे.
कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरून जातात, काय होणार आणि कसे होणार, या चिंतेने रुग्ण आपली प्रतिकारशक्ती गमावतात. त्यामुळे कोरोना रुग्णांना व्यायाम करण्याचा सल्ला सध्या डॉक्टरांकडून दिला जातोय. यामध्ये प्रामुख्याने योग आणि प्राणायामच्या माध्यमातून रूग्णांची श्वसन क्षमतेची क्रियाशिलता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोणी (ता. राहाता) येथील प्रवरा कोविड सेंटर सुरू करताना रुग्णांसाठी योग आणि प्राणायामचे वर्ग सुरू करण्याची संकल्पना आमदार राधाकृष्ण विखे यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्याची सुरूवात केली.
सध्या या कोविड सेंटरमध्ये दोनशेहून जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी कमी लक्षणे असलेल्या परंतु विलगीकरण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून संध्याकाळी सहा वाजता योग आणि प्राणायाम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेतले जात आहेत. प्रत्यक्ष कोविड सेंटरमध्ये जाण्यासाठी असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन रुग्णांकरिता स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
.............
कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णाची मानसिकता ही नकारात्मक होते. त्याचा परिणाम शरिरावर होतो. त्यामुळे उपचारांबरोबरच रुग्णांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या योग, प्राणायाम वर्गातून होईल, असा सकारात्मक विचार यामागे आहे.
- राधाकृष्ण विखे, आमदार
.........
कोरोना रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. रुग्णांना रोज संध्याकाळी एक तास याचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून रुग्णांमध्ये योगाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहेच पण यापेक्षाही त्यांच्या मनातील नकारात्मक भावना कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे.
- प्रा. संजय चोळके
योग प्रशिक्षक, लोणी.