राहात्यातील १९ गावांत झाली चुरशीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:39+5:302021-01-18T04:18:39+5:30
राहाता : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लोणी खुर्द, बाभळेश्वर, हनुमंतगाव या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली, तर ...
राहाता : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लोणी खुर्द, बाभळेश्वर, हनुमंतगाव या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली, तर उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम रंगली. ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे १९ गावांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे.
बड्या नेत्यांसमवेत गावात नेतृत्व सिद्ध करण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. गणेश परिसरातील १२ व प्रवरा परिसरातील १३, अशा २५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोल्हार बुद्रुक, तीसगाव, पिंप्री लोकाई, भगवतीपूर, सावळी विहीर खुर्द, लोणी बुद्रुक या ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित अस्तगाव, एकरुखे, केलवड, गोगलगाव, नांदूर, पाथरे, पिंपळवाडी, बाभळेश्वर, ममदापूर, लोणी खुर्द, वाळकी, हनुमंतगाव, जळगाव/यलमवाडी, रांजणगाव, रामपूरवाडी, शिंगवे, आडगाव, हसनापूर, चंद्रापूर या १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या.
राहाता तालुक्यात स्थानिक पातळीवर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षापेक्षा गणेश परिसरातील अकरा गावांत काळे, कोल्हे, विखे या गटांचे वर्चस्व दिसून येते. प्रवरा परिसरात आमदार राधाकृष्ण विखे, रावसाहेब म्हस्के, जनार्दन घोगरे, भास्करराव फणसे यांच्या गटाचे स्थानिक पातळीवर वर्चस्व आहे. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांचा राहाता तालुका बालेकिल्ला मानला जातो. सध्याही बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार विखे गटाचा ताबा आहे.
................
अटीतटीची लढत
राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लोणी खुर्द, बाभळेश्वर, हनुमंतगाव या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, तर उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दोन्हीही गटात विखे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेच्या रंगीत तालमीबरोबरच वरिष्ठांसमोर स्वत: नेतृत्व सिद्ध करण्याची संधी म्हणून बघितले जात आहे.
.............
७८ टक्के मतदान
राहाता तालुक्यात १९ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. जळगाव व बाभळेश्वर ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर लांबवर मतदारांच्या रांगा असल्याने येथे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. राहाता तालुक्यातील अस्तगाव, बाभळेश्वर, एकरुखे या गावांतील मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक ९२ टक्के मतदान झाले.