जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जागरुक राहा : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:10 PM2018-05-23T15:10:09+5:302018-05-23T15:10:55+5:30
आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.
अहमदनगर : आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. द्विवेदी यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महिला संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी, त्याअनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थितीची माहिती घेतली. अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक आदींनी अशा प्रकाराबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. महिला व बालविकास विभागाने त्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात अठरा वर्षे वयाखालील मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे याबाबत शालेय पातळीवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यात विविध ठिकाणी आस्थापनांवर बालकामगार असतील तर अशा आस्थांपनांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या बालकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी महिला व बालविकास विभागाला दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय शिंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व गोविंद दाणेज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.