शेतीच्या वादातून मारहाण; कु-हाडीच्या घावाने एकाचा डोळा निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:17 AM2020-05-27T11:17:03+5:302020-05-27T11:19:58+5:30
चारीचे पाणी शेतात घुसल्याच्या रागातून एकावर कु-हाडीने वार करीत त्याचा डोळा निकामी केल्याची घटना नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे सोमवारी घडली. जखमी विष्णू गंगाधर माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा : चारीचे पाणी शेतात घुसल्याच्या रागातून एकावर कु-हाडीने वार करीत त्याचा डोळा निकामी केल्याची घटना नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे सोमवारी घडली. जखमी विष्णू गंगाधर माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दि.२५ मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मी माझ्या शेतातील कडवळाला पाणी देत असताना चुलत भाऊ नारायण माने याने आवाज देवून सांगितले की, चारीच्या मोरीत गबाळ गुंतलेले आहे. त्यामुळे आमच्या शेतात पाणी येत आहे. तू ते गबाळ काढून घे. त्यामुळे मी चारीजवळ गेलो असता तेथे मारुती साबाजी माने, नारायण साबाजी माने, रामकिसन मारुती माने व रंभाजी कोंडिबा वाघमोडे हे तिथे होते. त्यावेळी मारुती माने याच्या हातात कु-हाड तर नारायण माने यांच्या हातात लाकडी दांडा होता. मी तिथे गेल्यावर त्यांना म्हणालो, चारीमध्ये काहीच गबाळ नाही. मला तुम्ही का बोलवले? याचा राग आल्याने त्यांनी मला खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण, शिवीगाळ सुरू केली. त्याचवेळी मारुती माने याने त्याच्या हातातील कु-हाड मला जीवे मारण्याचा उद्देशाने डोक्यात मारत असताना मी डोके बाजूला केल्याने कु-हाडीचा घाव माझ्या डाव्या डोळ्याला लागला. त्यातून रक्त येऊ लागले. मी खाली पडलो. त्यानंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मला मारहाण केली. मी आरडाओरडा केल्यानंतर ते तेथून निघून गेले, असे जखमी झालेल्या माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
जखमीस उपचारासाठी नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले आहे. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते करीत आहे.