वीज कार्यालयात धुमाकूळ घालून कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:22+5:302021-02-07T04:19:22+5:30

अहमदनगर : वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तेलीखुंट कक्ष कार्यालयातील तीन वीज कामगारांना मारहाण करीत ...

Beating the employees in the power office | वीज कार्यालयात धुमाकूळ घालून कर्मचाऱ्यांना मारहाण

वीज कार्यालयात धुमाकूळ घालून कर्मचाऱ्यांना मारहाण

अहमदनगर : वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तेलीखुंट कक्ष कार्यालयातील तीन वीज कामगारांना मारहाण करीत एकाने वीज कार्यालयात धुमाकूळ घातला. त्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेळके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ५ फेब्रुवारी रोजी शेळके व त्यांचे सहकारी बाह्यस्रोत कर्मचारी बापुसाहेब बडेकर हे तेलीखुंट कार्यालयात रात्रपाळी ड्युटीवर होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या कार्यालयाशेजारी राहणारा निखिल बाळकृष्ण धंगेकर हा तेलीखुंट कार्यालयात आला व काहीही कारण नसताना त्याने कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केली. त्याबाबत त्याला जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करून शेळके व बडेकर यांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर, तो घरी निघून गेला. १५ ते २० मिनिटांनंतर तो चाकू घेऊन आला व त्याने शेळके यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बडेकर हे मधे धावले. त्यात त्यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकाराबाबत बडेकर यांनी तेलीखुंट कक्षाचे सहायक अभियंता राजेंद्र पालवे यांना सांगितले. पालवे हे तातडीने कार्यालयात आले. तेव्हा आरोपी धंगेकर खुर्चीवर बसलेला होता. पोलीस ठाण्यात तक्रार करू नका, मला ३५३ ने काही फरक पडत नाही, असा दम देत, त्याने पालवे यांनाही मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. घाबरून सर्व वीज कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला व तांबटकर गल्लीत आडोशाला बसले, अशा फिर्यादीवरून निखिल धंगेकर याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक आव्हाड, सचिव किशोर काळे, शरद काकडे, अभिजीत ठमके आदींनी या मारहाणीचा निषेध केला आहे.

Web Title: Beating the employees in the power office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.