मिस्ड कॉलबाबत विचारणा केल्याने एका कुटुंबाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:42+5:302021-05-20T04:22:42+5:30

जामखेड : मिस्ड कॉल का केला, असे विचारणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड, दगडाने मारहाण ...

Beating a family for asking about a missed call | मिस्ड कॉलबाबत विचारणा केल्याने एका कुटुंबाला मारहाण

मिस्ड कॉलबाबत विचारणा केल्याने एका कुटुंबाला मारहाण

जामखेड : मिस्ड कॉल का केला, असे विचारणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करण्याचा प्रकार जामखेडे शहरातील तपनेश्वर गल्लीत सोमवारी (दि.१७) मध्यरात्री घडला. यामध्ये एका व्यक्तीसह त्याची पत्नी, मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार ते पाच जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

भाऊराव अर्जुन डाडर (वय ४६, रा. काकडे बिल्डिंग, तपनेश्वर गल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली. भाऊराव डाडर हे रविवारी मोलमजुरी करून रात्री घरी आले. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर कोणाचा फोन आला. त्यावेळी तो आलेला फोन ते घेऊ शकले नाहीत. कोणी तरी आपल्याला फोन केला हे त्यांना मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास लक्षात आले. त्यांनी मिस्ड कॉल आलेल्या व्यक्तीला पावणेएक वाजता फोन केला. त्यावेळी समोरील व्यक्ती थेट शिवीगाळ करू लागली. शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने भाऊराव डाडर यांना घराचा पत्ता विचारला. मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास भाऊ डाडर, युवराज डाडर व इतर ४ ते ५ जण तीन मोटारसायकलवरून तपनेश्वर गल्ली येथे आले. भाऊ डाडर याने फिर्यादी भाऊराव डाडर यांना फोन करून घराबाहेर बोलाविले. यावेळी भाऊ डाडरसह चार ते पाच जणांनी भाऊराव डाडर यांना लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली. मारहाणीवेळी आरडाओरड झाल्याने भाऊराव डाडर यांची पत्नी योगिनी व मुलगा अखिलेश बाहेर आले. त्यांनी आरोपीस अडविण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्या दोघांनाही मारहाण केली व तेथून निघून गेले. जखमी अवस्थेत ते तिघे शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. त्यानंतर जखमी भाऊराव डाडर यांच्या फिर्यादीवरून भाऊ डाडर, युवराज डाडर यांच्यासह ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Beating a family for asking about a missed call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.